मुंबईमधील महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या निर्भया पथकाची पोलीस वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरली जात असल्याची माहिती समोर आली आहे. ही वाहनं निर्भया निधीतून खरेदी करण्यात आली होती. असं असूनही या वाहनांचा वापर वेगळ्या कारणांसाठी केला जात आहे. एका इंग्रजी वृत्तापत्राने याचं वार्ताकन केल्यानंतर ही बाब उघडकीस आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राज्यातील अनेक नेत्यांकडून शिंदे गटावर टीका केली जात आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही शिंदे गटावर टीका केली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी आणलेल्या गाड्यांचा वापर शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी केला जात आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

हेही वाचा- “अरे गोपीचंदा, तुला काही कळतं की नाही बाबा”, पडळकरांच्या ‘त्या’ विधानावर अजित पवारांची तुफान टोलेबाजी!

या प्रकरणावर भाष्य करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “डॉ. मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते, त्यावेळी ‘निर्भया फंड’ची स्थापना करण्यात आली होती. राज्य आणि देशातील महिलांच्या सुरक्षेसाठी हा निधी निर्माण केला होता. या निधीचे पैसे फक्त महिला सुरक्षेसाठीच वापरायला हवे. पण महिलांच्या सुरक्षेसाठी आणलेल्या गाड्या वेगळ्या कारणासाठी वापरल्या जात आहेत, हे अतिशय दुर्दैवी आहे.”

हेही वाचा- “काय भिकारड्यासारखा…”, थेट वेळ आली म्हणत अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल!

“लोकप्रतिनिधिंची सुरक्षा महत्त्वाची आहे, ही बाब मी मान्य करते. पण त्यासाठी महिलांच्या सुरक्षेसाठी आणलेल्या गाड्या काढून घेणं, हे आयोग्य आहे. राज्यातील महिला आणि नागरिकांची सुरक्षा, हा कुठल्याही सरकारचा प्राधान्यक्रम असला पाहिजे. या सरकारमध्ये ‘व्हीआयपी कल्चर’ फोफावत असून हे अत्यंत दुर्दैवी आहे,” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mp supriya sule on nirbhya fund and eknath shinde govt mla security rmm