भाजपा नेत्या पंकजा मुंडे मागील काही काळापासून पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. अलीकडेच जीएसटी विभागाने त्यांच्या कारखान्यावर कारवाई केली होती. यानंतर पंकजा मुंडेंनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आर्थिक अडचणींबद्दल खुलासा केला होता. या सर्व घडामोडींवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पार्टीवर टीकास्र सोडलं आहे. भाजपा ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ असा नारा देते, पण त्यांनी आधी मुंडे भगिनींना न्याय द्याव, अशा आशयाची टिप्पणी केली आहे. त्या अहमदनगर येथील कार्यक्रमात बोलत होत्या.
ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पंकजा मुंडे अनेकदा शरद पवारांना भेटायला यायच्या. आपण कधीही त्यात राजकारण आणलं नाही. निवडणुकीच्या वेळी आम्ही टोकाची भूमिका घ्यायचो. एकमेकांविरुद्ध लढायचो. पण जेव्हा ऊसतोड कामगारांचा विषय असेल, तेव्हा आम्ही नेहमी पंकजा मुंडेंचा मान-सन्मान केला आहे. आजही करू आणि उद्याही करू. कारण त्या एक लढाऊ महिला आहेत. मला खरंच त्या मुलीबद्दल प्रेम वाटतं. याचं कारण म्हणजे, ती एकटी लढतेय, तिचे वडील हयात नाहीयेत. तिच्या घरात कुठलाही कर्ता पुरुष नाहीये.
हेही वाचा- “…आम्ही तसं बोललोच नाही”, शरद पवारांचा हुकुमशहा उल्लेख केल्याप्रकरणी अजित पवार गटाची भूमिका
१९९५ साली जेव्हा महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आली. तेव्हा दोन लोकांनी काँग्रेसविरोधात रान पेटवलं होतं. ते म्हणजे प्रमोद महाजन आणि दुसरे म्हणजे गोपीनाथ मुंडे. दोघंही आज हयात नाहीत. आज भाजपा कशा पद्धतीने त्यांच्या मुलींना वागवतोय, हे सर्वांना दिसतंय. भाजपाचे लोक ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ असं म्हणतात, मग आधी या दोन मुलींचं चांगलं करा. तुम्हाला जमत नसेल तर मोठी बहीण म्हणून मी जबाबदारी घेईन. कारण प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात प्रेम आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हेही वाचा- “अजित पवार गटाकडून जयंत पाटील मुख्यमंत्री होणार असतील, तर…”, सुप्रिया सुळेंचं विधान चर्चेत
“आमचे विचार वेगळे होते. पण प्रमोद महाजन हे या देशाचे मोठे नेते होते. त्यांचे आणि आमचे ऋणानुबंध अनेक वर्षांचे होते. माझ्या जन्मापासून प्रमोद महाजन आमच्या घरी यायचे. दुर्दैवाने ते लवकर गेले. गोपीनाथ मुंडेंनीही शून्यातून एवढं मोठं विश्व निर्माण केलं. आमचे राजकीय मतभेद होते, पण वैयक्तिक मतभेद कधीच नव्हते. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे दोघंही मराठमोळी मुलं आहेत. महाराष्ट्राच्या मातीत त्यांचा जन्म झाला. दोघांनीही दिल्ली गाजवली. हे आपल्याला नाकारून चालणार नाही. भाजपा हे विसरला असेल, पण मी नाही विसरले कारण माझ्या महाराष्ट्रात त्यांचा जन्म झाला,” असंही सुप्रिया सुळे भाषणात म्हणाल्या.