Supriya Sule On Santosh Deshmukh Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक देखील केलं. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी तीन तपास यंत्रणांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आता या घटनेतील आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या आरोपपत्रात वाल्मीक कराड मुख्य सूत्रधार असल्याची चर्चा माध्यमांमध्ये आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, या संपूर्ण घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत टीका केली आहे. ‘परळीचे लोक साधे सरळ आहेत, पण दोन लोकांमुळे राज्याची बदनामी झाली’, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी खासदार सुप्रिया सुळे यांना विचारला. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “मला याचं काही आश्चर्य वाटत नाही. बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांचा अमानुषपणे खून झाला आहे. मला एकच प्रश्न आहे की या व्यक्तींची हिंमत कशी होते? त्यांना हा अधिकार कोणी दिला? त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामागे त्यांच्या पाठिमागे कोणीतरी असल्याशिवाय एवढा अंदाधुंद कारभार कसा चालेल? हे दुर्देव आहे की संतोष देशमुखांच्या कुटुंबाला एवढ्या मोठ्या पद्धतीने किंमत मोजावी लागली”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा का?
खासदार सुप्रिया सुळे धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा का? असा सवाल सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला असता त्या म्हणाल्या, “नैतिकतेची आणि त्यांची कधी भेटच झाली नाही. तसेच या प्रकरणाबाबत सुरेश धस म्हणाले तसं शिक्कामोर्तब होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आपण त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? बीडमध्ये कोणती केस राहिली आहे? खूनाची घटना घडली, खंडणीची घटना घडली. शेतकऱ्यांची पीक विम्याची फसवणूक, शेतकऱ्यांची हार्वेस्टरमध्ये फसवणूक, एवढा मोठा खंडणीचा गुन्हा घडला मग अजून कुठला गुन्हा करायचा राहिला आहे?”, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
‘बीडमधील दहशत मोडून काढायचीय’
“मी कधीही कोणावर खोटेनाटे आरोप करत नाही. ते माझं राजकारण देखील नाही. मात्र, आवादा नावाच्या कंपनीने जेव्हा तक्रार केली होती, तेव्हाच या आरोपींना आवरलं असतं तर हे प्रकरण घडलं नसतं. देशमुख कुटुंबाला न्याय मिळणं ही सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. बीडमध्ये जी दहशत आहे ती दहशत मोडून काढायची आहे. जर मंत्र्यांच्या पीएस आणि ओएसडींना कायदा आहे, तर आमदार आणि खासदारांनाही तोच कायदा असला पाहिजे. जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्यात बदल घडू इच्छित आहेत, तर आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. दिल्लीत आम्हाला कोणी भेटलं तरी विचारतं की बीडच्या घटनेत काय झालं? परळीचे लोक साधे आणि सरळ आहेत. पण दोन लोकांमुळे राज्याची बदनामी झाली आहे. दोन लोकांच्या कृतीमुळे राज्याचं नाव देशपातळीवर खराब झालं आहे”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.