राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाने शिर्डी येथे आयोजित केलेले शिबिर जितेंद्र आव्हाड यांच्या रामाबाबतच्या विधानामुळे बरेच गाजले. या विधानानंतर खुद्द पवार गटातील नेत्यांमधील विसंवाद चव्हाट्यावर आला. ज्यावर अजित पवार गटाने जोरदार टीका केली. जितेंद्र आव्हाड यांच्या विधानानंतर रोहित पवार यांनी केलेले ट्विट आव्हाड यांना चांगलेच बोचल्याचे दुसऱ्या दिवशी घेतलेले पत्रकार परिषदेत दिसले. रोहित पवार हे लहान असून ते आमदार म्हणून नवखे आहे, त्यांना मी फार महत्त्व देत नाही, इथपर्यंत आव्हाड यांनी आपला संताप व्यक्त केला होता. या विषयावर आता पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका मांडली आहे.
टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्यांनी आधी आव्हाड यांच्या रामाबाबतच्या वक्तव्यावर भाष्य केले. त्या म्हणाल्या, “‘मी ‘रामकृष्ण हरी’वाली आहे. माझ्या ओठात, मनात, हृदयात राम कृष्ण हरी आहेत. माझ्यावर संत परंपरा आणि वारकरी संप्रदायाचे संस्कार आहेत. त्याच्यामुळे अनेकवेळा जेव्हा असे हल्ले होतात, तेव्हा आपण गप्प बसायचे असते. गप्प बसण्यात मोठी ताकद होते. जितेंद्र आव्हाड यांनी त्याच्यावर त्यांचे मत स्पष्ट केले आहे. कुणाला वाईट वाटले असेल, तर आपण सर्वांनीच सगळ्यांच्या भावनांचा मान-सन्मान ठेवला पाहीजे.”
‘जितेंद्र आव्हाड वयाने मोठे नेते’
जितेंद्र आव्हाड यांच्या रामाबाबतच्या वक्तव्यानंतर रोहित पवार यांनी एक्स या साईटवरून पोस्ट टाकून त्यांना देव-धर्मावर न बोलण्याचा सल्ला दिला होता. मात्र आव्हाड यांना हा सल्ला रुचला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी खेद व्यक्त करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी रोहित पवारांचा सल्ला झिडकारून लावत त्यांच्या बोलण्याला महत्त्व देत नसल्याचे म्हटले. तसेच अबू धाबीत बसून पोस्ट टाकणे सोपे असते, असा चिमटाही आव्हाड यांनी रोहित पवारांना काढला होता.
यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “जितेंद्र आव्हाड वयाने रोहितपेक्षा मोठे आहेत. माझ्यापेक्षाही मोठे आहेत. आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेल्यांनी आपल्याला सल्ला दिला असेल तर त्यात गैर काय? याच्यात काहीच चूक वाटत नाही. मोठ्यांचा सल्ला आणि आशीर्वाद घेणे, ही आपली संस्कृती आहे. जितेंद्र आव्हाड यांनी रोहितला जर सल्ला दिला असेल तर त्यात मला काही विशेष वाटत नाही. कारण मी सुसंस्कृत, स्वाभिमानी, भारतीय आणि मराठी मुलगी आहे. त्यामुळे ज्येष्ठांचे आदर आणि लहानांना प्रेम देणे, ही माझी संस्कृती आहे.”
आणखी वाचा >> “आपलेच घरभेदी सहकारी…”, रोहित पवारांच्या कंपनीवर कारवाई होताच जितेंद्र आव्हाडांची मोठी प्रतिक्रिया
जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांच्या खटके उडाल्यानंतर अजित पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले होते की, ही तर आता वादाची सुरुवात आहे. पुढे अनेक वाद होतील. याबाबतचा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारला असता त्या म्हणाल्या की, तटकरे यांचे हे वैयक्तिक मत आहे. लोकशाही आहे, त्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
तर छगन भुजबळ म्हणाले होते की, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. शरद पवार यांचा गट संपविण्यासाठी कुठल्याही बाहेरच्या लोकांची गरज नाही. त्यांचेच लोक पुरेसे आहेत. याबद्दलही सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया विचारली असता त्या म्हणाल्या, माननीय भुजबळ साहेब जवळपास माझ्या वडीलांच्या वयाच्या आहेत. भुजबळ साहेब आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या लोकांवर टीका करायची नसते, असे संस्कार माझ्यावर झालेले आहेत. त्यामुळे माझ्या वडीलांच्या वयाच्या भुजबळ साहेबांना बोलायचा अधिकार आहे. ते काही बोलले असतील तर त्यावर मला आक्षेप घ्यायचा नाही.