नांदेड जिल्ह्यातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मागील २४ तासांत तब्बल २४ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १२ नवजात बालकांचा समावेश आहे. या घटनेची माहिती समोर येताच संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापत असून राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
ठाण्यातील रुग्णालयात घडलेल्या घटनेच्या वेळी दाखवलेला बेदरकारपणा आणि बेफिकीरी यावेळीदेखील दिसतेय. लपवाछपवी सुरू असून एकमेकांच्या चुकांवर पांघरूण घालण्याचे उद्योग सुरू आहेत, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी ‘एक्स’ (ट्विटर) खात्याद्वारे केला. तसेच संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही खासदार सुळेंनी केली.
हेही वाचा- “महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार”; ठाकरे गटाच्या नेत्याचं सूचक विधान, नेमकं काय म्हणाले?
‘एक्स’वर लिहिलेल्या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे म्हणाल्या, “नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयात गेल्या २४ तासांत १२ नवजात बालकांसह २४ जणांचा मृत्यू झाला. हे मृत्यू केवळ योगायोग नक्कीच नाहीत. या प्रत्येक मृत्यूची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. एका दिवसात एवढे मृत्यू होत असतील तर त्याचे गांभीर्य मुख्यमंत्री आणि यंत्रणेनं लक्षात घेऊन तत्काळ चौकशीचे आदेश देणे अपेक्षित आहे.”
हेही वाचा- “अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
“ठाण्याच्या घटनेच्या वेळी दाखवलेला बेदरकारपणा आणि बेफिकीरी यावेळीदेखील दिसतेय. लपवाछपवी सुरू असून एकमेकांच्या चुकांवर पांघरूण घालण्याचे उद्योग सुरू आहेत. रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांना वेळेवर औषधे मिळाली नसल्याचा आरोप होत आहे. याचा अर्थ, महाराष्ट्रातील जनतेचे जीव एवढे स्वस्त झाले आहेत का? यामध्ये दिरंगाई आणि दुर्लक्षाची बाब दिसत असून कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करुन राज्याच्या संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे,” अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली.
हेही वाचा- २४ तासांत २४ जणांचा मृत्यू; नांदेडच्या सरकारी रुग्णालयातील खळबळजनक प्रकार
सुप्रिया सुळेंनी पोस्टमध्ये पुढे म्हटलं, “याखेरीज या मृतांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळायला हवी. या सर्व मृतांच्या कुटुंबीयांच्या प्रती संवेदना आणि मृत्यूमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.”