पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे- सोलापूर महामार्गावरील शेवाळेवाडी येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यामुळे रस्त्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्या वाहतूक कोंडीचा फटका खासदार सुप्रिया सुळे यांना देखील बसला. सुप्रिया सुळे यांनी अखेर थेट रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
सुप्रिया सुळे यांनी या वाहतूक कोंडीचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. तसेच वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचं आवाहन त्यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात, “हडपसर ते सासवड या पालखी महामार्गाकडे तातडीने अगदी ‘टॉप प्रायोरिटी’वर लक्ष देण्याची गरज आहे. या रस्त्याची प्रचंड अशी दुरवस्था झाली असून सातत्याने येथे वाहतूक कोंडी होते. आता तर अशी अवस्था आहे की येथे एक गाडी जरी बंद पडली तरी प्रचंड अशी वाहतूक कोंडी होते. याचा नागरीकांना प्रचंड त्रास व मनस्ताप होत आहे. तरी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री मा. नितीनजी गडकरी आपणास नम्र विनंती आहे की, हे काम तातडीने हाती घेऊन ते मार्गी लावणे आवश्यक आहे.कृपया याबाबत सकारात्मक विचार करावा”, अशी विनंती सुप्रिया सुळेंनी ट्वीट करत केली आहे.
या ट्वीटसोबत सुप्रिया सुळे यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. एक छोटा ट्रक बंद पडल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचं दिसत आहेत. सुप्रिया सुळे यांनी स्वतः गाडीतून उतरून आजूबाजूच्या वाहनांना वाट करून दिली आणि ही वाहतूक कोंडी फोडल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.