राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या जेवणात अंड्याचं कवच आढळल्याप्रकरणी एअर इंडियाने संबंधित केटररला दंड ठोठावला आहे. राज्यसभेवर खासदार असलेल्या वंदना चव्हाण एक ऑक्टोबर रोजी पुण्याहून दिल्लीला एअर इंडियाच्या विमानाने जात असताना हा प्रकार घडला होता.

पुणे-दिल्ली प्रवासादरम्यान चव्हाण यांनी ब्रेकफास्टसाठी ऑमलेट मागवलं होतं. पण, त्यात त्यांना अंड्याच्या कवचाचे तुकडे दिसले. त्यानंतर चव्हाण यांनी याबाबत ट्विटरद्वारे संताप व्यक्त केला होता. एअर इंडियाकडे घडलेल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी तक्रार केली होती. ट्विटरद्वारे केलेल्या तक्रारीत त्यांनी एअर इंडिया, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, डीजीसीए, नागरी उड्डाण मंत्रालयालाही टॅग केलं होतं.

“ब्रेकफास्टला मी ऑमलेट मागवलं. तीन-चार घास खाऊन झाल्यावर अंड्याच्या कवचाचे तुकडे त्यात दिसले. हे कमी म्हणून की काय, कुजलेले बटाटे, अर्धवट शिजलेले दाणे, जॅमच्या डब्यावर पांढुरकी पावडर अशा गोष्टीही निदर्शनास आल्या”, अशा आशयाची तक्रार चव्हाण यांनी केली होती.

दरम्यान, चव्हाण यांनी रविवारी केलेल्या तक्रारीची दखल अखेर एअर इंडियाने घेतली आहे. ‘भविष्यात असे प्रकार टाळावेत यासाठी या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. संबंधित केटररला दंड म्हणून हँडलिंग चार्जेस आणि संपूर्ण फ्लाईटच्या खाद्यपदार्थाची रक्कम देण्यास सुनावण्यात आली आहे’, अशी माहिती एअर इंडियाकडून देण्यात आली आहे.

Story img Loader