राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट हा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. अजित पवार यांनी दुसऱ्यांदा पक्ष व महाविकास आघाडीतून बाहेर पडत सरकारमध्ये सहभागी होण्याचं पाऊल उचललं आहे. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीच्या ८ आमदारांनीही शपथ घेतली आहे. तसेच, आता त्यांनी थेट राष्ट्रवादी पक्षावरच दावा ठोकत शरद पवारांनाच पदावरून पायउतार केल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर २०१९मध्ये राष्ट्रवादी काँग्रेससाठी ‘ऑपरेशन घरवापसी’ राबवणाऱ्या सोनिया दुहान यांनी अजित पवार गटावर परखड शब्दांत टीका केली आहे. तसेच, दिल्लीत होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीत काही मोठे निर्णय होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
सोनिया दुहान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एबीपीला दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी अजित पवारांचं बंड २०१९प्रमाणेच आत्ताही मोडून काढण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
“…तर आम्ही मागेपुढे पाहणार नाही”
“तेव्हाही (२०१९) आम्ही जिंकलो होतो, आताही आम्ही जिंकू. शरद पवारांसमोर असे प्रसंग पहिल्यांदा आले नाहीयेत. नेहमी तेच जिंकले आहेत. २०१९मध्ये शरद पवारांमुळेच आम्ही ते करू शकलो. आत्ताही गरज पडली, तर आम्ही मागेपुढे पाहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आम्ही काही मोठे निर्णय घेणार आहोत. बैठकीनंतर त्यासंदर्भात माहिती दिली जाईल”, असं सोनिया दुहान यावेळी म्हणाल्या.
अजित पवार यांना खुलं आव्हान!
“कोण किती पॉवरफुल आहे, हे फक्त सांगून काही होत नाही. जर कुणाकडे एवढं संख्याबळ आहे, तर त्यांनी ते दाखवावं. फक्त बोलून काही होत नाही. हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात”, अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांना खुलं आव्हान दिलं आहे.
“मला वाटत नाही की कुणाला महत्त्व दिलं गेलं नाही. एवढ्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या गेल्या. मला या गोष्टीचं वाईट वाटतंय, की एका ८३ वर्षांच्या व्यक्तीला तुम्ही सोडून जाताय. तुम्ही तुमच्या वडिलांनाही असेच सोडून गेला असता का? आई-वडिलांप्रमाणे त्यांनी तुम्हाला वाढवलं, मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. त्यांच्यामुळेच तुम्ही इथे उभे राहू शकला आहात. आज त्यांच्याशीच गद्दारी करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे”, अशा शब्दांत सोनिया दुहान यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
कोण आहेत सोनिया दुहान?
सोनिया दुहान या युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. अजित पवारांच्या बंडखोरीनंतर सोनिया दुहान यांच्यावर नुकतीच अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. २०१९मध्ये अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी केल्यानंतर त्यांच्या गटातील आमदारांना पुन्हा स्वगृही आणण्यात सोनिया दुहान यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचं सांगितलं जातं.