अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या नगरपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. यावेळी अनेक मोठ्या नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकीकडे रोहित पवार, रोहित पाटील यांच्यासारख्या तरुण नेत्यांनी चमकदार कामगिरी करत ठसा उमटवला असताना दुसरीकडे धनंजय मुंडे, शशिकांत शिंदे, एकनाथ शिंदे या दिग्गज नेत्यांना मोठा फटका बसला आहे. आपल्याच बालेकिल्ल्यात त्यांना पराभव सहन करावा लागला आहे.
साताऱ्यात शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेना जोरदार धक्का दिला आहे. शिवेसना १३ जागांवर विजयी झाली असून एकहाती सत्ता मिळवली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीला फक्त ४ जागा मिळाल्या आहेत.
तर बीडमध्ये भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचं वर्चस्व दिसून आलं. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मात्र धक्का बसला आहे. आष्टी, पाटोदा, शिरूर या नगरपंचायतींवर भाजपा आमदार सुरेश धस यांनी वर्चस्व मिळवत भाजपाचा झेंडा फडकवला आहे. तर वडवणी मध्ये सत्ताधारी भाजपाला बाजूला सारवत राष्ट्रवादीने विजय मिळवला.
नवाब मलिकांची प्रतिक्रिया –
“राष्ट्रवादीतील नवीन नेते रोहित पवार, सुनील शेळके, रोहित पाटील यांनी दोन तीन वर्ष आपल्या मतदारसंघात चांगला संपर्क ठेवला त्यामुळे त्यांना यश मिळाले आहे. मात्र काही अनुभवी नेत्यांच्या मतदारसंघात पक्षाला यश मिळाले नाही त्याचे आत्मपरीक्षण करून कारणे शोधली पाहिजे. व्यवस्थित लक्ष दिले तर राष्ट्रवादीला लोकं स्वीकारत आहेत हे आजच्या निकालावरून स्पष्ट होते,” असेही नवाब मलिक म्हणाले.
“आपण कुठे चुकत आहोत याचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे. स्थानिक नेत्यांना सर्व अधिकार देण्यात आले होते. पक्षाने कोणतीही मध्यस्थी केली नव्हती. जर काही चुकत असेल तर त्यांनी हे निकाल विरोधात का गेला याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं.
“भाजपाला जनतेने नाकारले आहे”
महाविकास आघाडीला ८० टक्के जागा मिळाल्या आहेत, याचा अर्थ भाजपाला जनतेने नाकारले आहे अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे. “राज्यात झालेल्या नगरपंचायत निवडणूकीत जनतेचा कल राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या बाजूने दिसत आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादी स्वबळावर लढली आहे तर काही ठिकाणी सेनेबरोबर तर काही ठिकाणी तिन्ही पक्ष स्वबळावर लढले आहेत असे असताना मतांचे विभाजन होऊनही जनतेने महाविकास आघाडीच्या पारड्यात आपला कौल टाकला आहे,” असेही नवाब मलिक म्हणाले.