नारपार प्रकल्पातील पाण्याचा एक थेंबही गुजरातला देणार नाही, असा इशारा देतानाच यासाठी शहीद झालो तरी हा लढा सोडणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. या बिनकामी सरकारला धडा शिकवा आणि परिवर्तनाच्या माध्यमातून या सरकारला खड्डयात गाडा, असेही त्यांनी नमूद केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेचा गुरुवारी सहावा दिवस असून परिवर्तन यात्रेच्या दुसर्या टप्प्याची सुरुवात नाशिक जिल्हयातून झाली. गुरुवारी दिंडोरी शहरात झालेल्या सभेत छगन भुजबळ यांनी सत्ताधारी भाजपावर टीकेची झोड उठवली. दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, घोटी या परिसरात भात हे मुख्य पीक आहे. परंतु या सरकारला एवढी भीक लागली की भात पीकासाठी बारदाने खरेदी करायला सरकारकडे पैसे नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे भातपीक उचलले गेले नाही. हे सरकार नुसते विकासाच्या गप्पा मारतेय. अरे अगोदर बारदाने खरेदी करा. आता यांनी बारदाने खरेदी केली नाहीत तर यांचे बारदान करुन टाका असेही त्यांनी सांगितले.
मी परमेश्वराकडे एकच मागणे मागतो मला खूप मोठे आयुष्य दे, परंतु त्यामध्ये असं दे की वाघासारखा जगेन शेळीसारखा नाही असेही छगन भुजबळ यांनी ठणकावून सांगितले. नुसत्या घोषणा करणाऱ्या या भाजप सरकारची नुसती नौटंकी सुरु आहे असा आरोपही छगन भुजबळ यांनी केला. मी गप्प बसणार नाही. मला दाबण्याचा प्रयत्न केला तरी तितक्याच ताकदीने जनतेसाठी उभा राहीन असेही त्यांनी सांगितले.
ओबीसींच्या मतांसाठी भाजपा सरकार ७०० कोटींचा निधी जाहीर करत आहे. मात्र, आता तुमच्यावर घरी बसण्याची वेळ आली आहे. मग ७०० कोटी रुपये देणार कुठुन असा सवाल भुजबळ यांनी केला. ओबीसींचे आरक्षण रद्द करण्यासाठी कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ओबीसींचे आरक्षण कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी केला.