कांद्याला २०० रुपये देऊन काय होतं… क्विंटलला २०० रूपये देता… काय चेष्टा लावलीय का… शेतकऱ्यांना झालेल्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम करु नका, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपाला दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेचा गुरुवारी सहावा दिवस असून दिंडोरी शहरात झालेल्या सभेत अजित पवारांनी भाजपावर टीका केली. साडेचार वर्षांत भाजपा आणि शिवसेनेच्या सरकारने जनतेला गाजर दाखवण्याचे काम केले. माझ्या शेतकर्यांच्या घरात आर्थिक सुबत्ता यावी पण या सरकारच्या काळात ही सुबत्ताच गायब करण्यात आली, अशी टीका त्यांनी केली.
राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. परंतु दुष्काळग्रस्त भागात टँकर दिले जात नाही. याबाबतचा अद्याप जीआर निघाला नाही. कशी मिळणार मदत असा सवाल लोक करत असल्याचे अजित पवारांनी सांगितले. नारपारचे पाणी महाराष्ट्राला मिळाले पाहिजे यासाठी छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करत आहे. १०० टीएमसी पाणी गुजरातला दिले जात आहे. गुजरात आपलेच राज्य आहे परंतु आम्ही उपाशी… हे चालणार नाही. हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे असा आरोपही पवार यांनी केला.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान दिले नाही. हे सरकार फक्त घोषणाच करते. कृती काहीच करत नाही. भाजपाने राज्यावर ५ लाख कोटी कर्जाचा डोंगर उभा केला. छगन भुजबळ आणि जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. भाजप- सेनेचे खरं रुप जनतेसमोर परिवर्तन यात्रेमध्ये मांडत असल्याने त्यांची सुरक्षा कमी केली असल्याचा आरोप त्यांनी केला.
तुम्हाला आर्थिक सुबत्ता आणायची असेल, तुमच्या कांद्याला, ऊसाला, तुमच्या सर्वच समस्या सोडवायच्या असतील आणि तुमची राहिलेली सर्व कामे पूर्ण करायची असेल तर राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे रहा तुमची सर्व कामे करून देईन असे आश्वासन त्यांनी दिले.
जितेंद्र आव्हाड यांनी देखील सरकारवर टीका केली. किती लेबल लावणार आहात, किती विद्वेष पसरवणार आहात. संविधानच्या गाभ्याला हात लावण्याचे काम मोदी सरकार करत आहेत. संविधान जाळण्याचे काम या व्यवस्थेत केले गेले, असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. न्याय मिळत नाही मग न्याय मागायचा कुणाकडे. बोलघेवडे लोक या राज्य आणि केंद्रात आहेत. २०१४ चा खोटारडा प्रचार आज आपल्याला भोगावा लागतो आहे असेही आव्हाड यांनी म्हटले आहे. जोपर्यंत यांची सत्ता जात नाही तोपर्यंत यांच्या तोंडाला फेस आणणारा कांदा चेपल्याशिवाय थांबू नका, असेही आव्हाड म्हणालेत.