शरद पवार यांच्या नेतृत्वावर मी विश्वास ठेवला आणि त्यांनी आज माझ्यावर विश्वास टाकला असे म्हणत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे अभिनंदन केले आहे. राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस, भाजपाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानंतर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांबाबत घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे. यानंतर एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत भाष्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“माझे नाव विधान परिषदेसाठी नाव जाहीर केले यासाठी मी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने जाहीर केल्याबद्द्ल मी त्यांचे अभिनंदन करतो. गेली ४० वर्षे भाजपामध्ये निष्ठेने काम करत होतो. पण अनेक वेळा त्याठिकाणी अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली. भाजपात असताना विधान परिषदेसाठी नाव देण्याचे आश्वासन दिले होते. अनेक प्रसंग असे घडत गेले की त्यामुळे मला नाईलाजाने भाजपाचा त्याग करुन राष्ट्रवादीमध्ये यावं लागलं. शरद पवार यांच्या नेतृत्वावर मी विश्वास ठेवला आणि त्यांनी आज माझ्यावर विश्वास टाकला. तो विश्वास मी सार्थ करेन. आमच्या भागामध्ये भाजपा वाढण्यासाठी उभे आयुष्य काढले आता राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी काम करेन,” असे एकनाथ खडसे म्हणाले.

“राजकीय जीवनामध्ये मी अनेक चढ उतार पाहिले आहेत. सत्ता माझ्यासाठी महत्त्वाची नाही कारण बरीच वर्षे मी मंत्रीपदावर विरोधी पक्षनेते पदावर होतो. त्यामळे आमदारकीचे कौतुक आहे असे नाही. पण भाजपाने ज्या परिस्थितीत मला ढकललं आमि राष्ट्रवादीने मला आधार दिला हे महत्त्वाचे आहे. निवडून आल्यानंतर ज्यांनी माझे राजकीय पुर्नवसन केले त्यांच्याशी प्रामाणिक राहण्याची भूमिका मला पार पाडावी लागेल,” असे एकनाथ खडसे म्हणाले.

Maharashtra Breaking News Live: राज्यसभेची निवडणूक ते औरंगाबादसभेवरुन आरोप प्रत्यारोप;  क्षणोक्षणीच्या अपडेट्स एकाच क्लिकवर

“अनेक जणांनी मला सांगितले की म्हणाले एकनाथ खडसे इतिहासात जमा झाले. अशी शक्यता असताना राष्ट्रवादीने माझ्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. अडचणींच्या वेळेस हात देणे महत्त्वाचे असते. त्यामुळे मी कायम यांचा ऋणी राहणार आहे,” असेही खडसे म्हणाले.

पंकजा मुंडेंना उमेदवारी न देणे अत्यंत दुर्देवी – एकनाथ खडसे

यावेळी बोलताना पंकजा मुंडेंना नाकारण्यात आलेल्या उमेदवारीबाबतही एकनाथ खडसेंनी भाष्य केले आहे.  “हा जरी पक्षांतर्गत निर्णय जरी असली तरी मुंडे-फुंडकर-खडसे यांनी भाजपाला बहुजन समाजाचा चेहरा म्हणून देण्याचा प्रयत्न केला. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपाचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न केला. अशा स्थितीमध्ये पंकजा मुंडे यांना उमेदवारी न देणे हे अत्यंत दुर्देवी आहे. खेदजनक आहे. पंकजा मुंडेंवर हा अन्याय आहे. ज्यांनी पक्षासाठी काहीच केले नाही, ते अचानक येतात आणि पदावर बसतात. शेवटी तो त्या पक्षाचा निर्णय आहे,” असे एकनाथ खडसे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp nominates eknath khadse ramraje nimbalkar for legislative council abn