विदर्भात मिळालेल्या यशाने भाजपमध्ये उत्साह आहे. आता भंडाऱ्यामध्ये आपली ताकद सिद्ध करण्याकरिता राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी जोर लावला आहे. गडचिरोलीत पालकमंत्री राजे अम्बरीश यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
भंडारा जिल्ह्य़ात भंडाऱ्यासह तुमसर, पवनी आणि साकोली या चार पालिकांमध्ये तर गडचिरोली जिल्ह्य़ात गडचिरोलीसह वडसा-देसाईगंज या दोन अशा एकूण सहा पालिकेच्या निवडणुका होत आहेत. दोन्ही जिल्ह्य़ांत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवीत आहेत. भंडाऱ्यात राष्ट्रवादीची, पवनीत सेना आणि राष्ट्रवादी आघाडीची तर साकोलीत प्रथमच पालिका झाल्याने तेथे निवडणूक होणार आहे. गडचिरोली जिल्ह्य़ात गडचिरोली पालिकेवर सेनेची तर देसाईगंज पालिकेवर काँग्रेसची सत्ता आहे. सर्वत्र बहुरंगी लढती होत असून, रविवारी मतदान होणार आहे.
भंडारा जिल्ह्य़ात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे. विधान परिषदेच्या भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीला पराभूत केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. या निवडणुकीतील भाजपचा विजय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चणाक्ष राजकीय खेळीचा विजय मानला जातो. त्यामुळे विजयाची मालिका कायम राहावी म्हणून खुद्द मुख्यंत्र्यांनी भंडारा जिल्ह्य़ात सभा घेतल्या आहेत.
भंडारा जिल्हा हा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचा गृहजिल्हा आहे. पालिकेवरही त्यांच्याच पक्षाची सत्ता आहे. विधान परिषदेतील पराभव पटेल यांच्या जिव्हारी लागला असून पालिकेतील सत्ता कायम ठेवून ते जिल्ह्य़ावर आपली पकड कायम आहे हे दाखविण्याचा त्यांचा या निवडणुकीच्या माध्यमातून प्रयत्न आहे. साकोलीत प्रथमच निवडणूक होत असली तरी तेथे भाजपचे वर्चस्व आहे. पवनीत सेनेतील दुफळी पक्षाच्या मुळावर येण्याची शक्यता आहे.
गडचिरोलीत चुरस
गडचिरोली जिल्ह्य़ातील निवडणुकीत जिल्ह्य़ाचे पालकमंत्री राजे अम्बरीश आत्राम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राजघराण्यातील या तरुण नेतृत्वाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. याशिवाय काँग्रेस नेते विजय वड्डेट्टीवार, माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्यासह इतरही जुणी काँग्रेस नेते मंडळी निवडणुकीत सक्रिय आहेत. मात्र इतर जिल्ह्य़ांप्रमाणे याही जिल्ह्य़ात नेत्यांमधील गटबाजीचे जाहीर प्रदर्शन निवडणूक प्रक्रियेतच पाहायला मिळाले.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्य़ाच प्रचार दौरे केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही सभा घेतल्या. सत्तेत असलेला पक्ष म्हणून जो फायदा होतो तो फायदा नोटाबंदीच्या काळातही भाजपला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भंडारा जिल्ह्य़ात भंडारा आणि तुमसर येथे सत्ताबदल होण्याची शक्यता आहे. दोन्ही जिल्ह्य़ांत शिवसेनेची शक्ती आहे, पण भाजपची त्याला साथ नाही. त्यामुळे सेना स्वबळावर किती परिणामकारक ठरू शकते, हे या निवडणुकीत दिसून येणार आहे.
देसाईगंज वादग्रस्त
- निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव आणल्याने दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्याविरोधात प्राथमिक माहिती अहवाल दाखल झाला त्या गडचिरोली जिल्ह्य़ातील देसाईगंजची निवडणूक गाजत आहे.
- ज्या प्रभागातील उमेदवारीवरून दबाव टाकण्यात आला त्या प्रभागातील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. सत्तेचा कशा प्रकारे दुरुपयोग केला जात आहे, यावर काँग्रेसने प्रचारात भर दिला आहे.