Dhananjay Munde Resignation : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला ८० दिवस उलटले आहेत. याप्रकरणात सीआयडीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं आहे. या दोषारोप पत्रामधून अनेक खुलासे समोर आले आहेत. धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जाणारा वाल्मिक कराड हाच या हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचं दोषारोप पत्रात म्हटलं आहे. तसेच या दोषारोप पत्रातून संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भातील काही फोटो समोर आल्यानंतर राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यानंतर सर्वत्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आल्यानंतर अखेर आज (४ मार्च) धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी सविस्तर भूमिका पत्राद्वारे मांडण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हे पत्रक जारी केलं असून धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला असल्याचं म्हटलं आहे. तसेच कोणत्याही गुन्ह्याला, गैरकृत्याला पक्षाचे किंवा आमच्या नेत्यांचे कधीही समर्थन असणार नाही. आजच्या घटनेतून हाच संदेश राज्याला गेला आहे, असं पत्रात म्हटलं आहे.

राष्ट्रवादीने पत्राद्वारे काय भूमिका मांडली?

“धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी हे पत्रक जारी करत आहोत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रारंभापासूनच अशी स्पष्ट भूमिका राहिली आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे. बीडसह संपूर्ण राज्यभरातील आमच्या पक्षाच्या नेत्यांनी याबाबत अत्यंत ठाम भूमिका घेतली आहे. आज धनंजय मुंडे यांनी घेतलेला राजीनाम्याचा निर्णय हा नैतिकतेला धरून आहे. संतोष देशमुख प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय सुरू आहे आणि तो असाच चालू राहून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही आमची अपेक्षा आहे. हे प्रकरण न्यायालयीन असून तपास सुरू असल्याने त्यावर अधिक भाष्य करणे उचित ठरणार नाही”, असं राष्ट्रवादीने पत्रात म्हटलं आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे सांगू इच्छितो की कोणत्याही गुन्ह्याला, गैरकृत्याला पक्षाचे किंवा आमच्या नेत्यांचे कधीही समर्थन असणार नाही. आजच्या घटनेतून हाच संदेश राज्याला गेला आहे. धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी संबंध आहे असे तपासात समोर आलेले नाही. मात्र नैतिकतेच्या मुद्यावर एक जबाबदार राजकीय नेता म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्वीच नैतिक मुद्यांवर स्वतः राजीनामा देण्याचे उदाहरण निर्माण केले होते आणि या प्रकरणातही त्यांनी तशीच ठाम भूमिका घेतली होती. या प्रकरणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक महत्त्वाचा संदेश देत आहे न्याय व्यवस्था आणि कायदा यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्या कामात आम्ही कधीही हस्तक्षेप करणार नाही. न्यायाला विलंब होऊ नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत”, असं राष्ट्रवादीने प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटलं आहे.

Story img Loader