मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिर्डी दौऱ्यावर असताना सिन्नरमध्ये जाऊन ज्योतिषाकडून भविष्य पाहिल्याचा आरोप होत आहे. यावरून महाविकासआघाडीच्या घटकपक्षांकडून मुख्यमंत्री शिंदेवर सडकून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे यांनीही महाराष्ट्राच्या भविष्याकडे लक्ष द्या नाहीतर महाराष्ट्राची जनता तुमचं भवितव्य अंधकारमय केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला आहे.

रविकांत वरपे म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःचे भविष्य बघण्यासाठी नाशिकला जातात. पण ज्या महाराष्ट्राचे भवितव्य उद्योग धंद्यावर अवलंबून आहे ते उद्योग धंदे गुजरातला चालले आहेत. महाराष्ट्राचे भवितव्य येथील गावांवर, जिल्ह्यांवर आहे. त्या गावांवर, जिल्ह्यांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री हक्क दाखवतात. महाराष्ट्राचे भवितव्य अंधकारमय करायला निघालेले मुख्यमंत्री स्वतःचे भवितव्य बघतात.”

“महाराष्ट्राचे दोन तुकडे करण्याऐवजी महाराष्ट्राच्या भविष्याकडे लक्ष द्या”

“मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना नम्र आवाहन करतो की, महाराष्ट्राच्या तरुणांचा रोजगार, महाराष्ट्रातील गावांचे, महाराष्ट्राचे दोन तुकडे करण्याऐवजी महाराष्ट्राच्या भविष्याकडे लक्ष द्या. नाहीतर महाराष्ट्राची जनता तुमचं भवितव्य अंधकारमय केल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा रविकांत वरपे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खरंच ज्योतिषाकडे जाऊन भविष्य पाहिलं का? केसरकर म्हणाले, “१० मित्रांना फोन करून…”

नेमकं प्रकरण काय आहे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बुधवारी (२३ नोव्हेंबर) शिर्डी दौऱ्यावर असताना अचानक पूर्वनियोजित कार्यक्रमात बदल करून सिन्नरमधील ईशान्येश्वर मंदिराला भेट दिली. यानंतर एकनाथ शिंदेंनी ईशान्येश्वर मंदिरामध्ये एका ज्योतिषाकडून आपलं भविष्य जाणून घेतल्याची जोरदार चर्चा आहे. त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.

Story img Loader