काँग्रेस आघाडीचे उमेदवारी नीलेश राणे यांच्याविरोधात प्रचार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारवाईला सामोरे जात असलेले आमदार दीपक केसरकर यांनी सोमवारी सावंतवाडीमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले. कोकणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ‘नीलेश राणे यांच्या विरोधात मतदान करा’ असे आवाहन करत केसरकरांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे नारायण राणे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने दीपक केसरकर यांना कारणे दाखवा नोटीस आणि जिल्हाध्यक्ष बाळ भिसे यांच्या हकालपट्टी केल्यानंतर त्याची उलट प्रतिक्रिया राष्ट्रवादीत उमटली. सावंतवाडीत झालेल्या या शक्तिप्रदर्शन मेळाव्यात मत्स्योद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष पुष्पसेन सावंत, माजी आमदार शंकर कांबळी, नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. ‘काँग्रेस पक्षाला नव्हे तर नारायण राणे यांच्या वृत्तीला विरोध असल्याने नीलेश राणे यांचा प्रचार करणार नाही तसेच सर्वानी शिवधनुष्य हाती घ्या,’ असे उघड आवाहन या बैठकीत करण्यात आले. राणे यांच्या मुलासाठी प्रचार केला असता तर मे महिन्यात मला कॅबिनेट मंत्रिपद देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, असा दावाही त्यांनी केला. ‘सर्वसामान्य लोकांच्या संरक्षणासाठी व विकासासाठी हा लढा आहे. भालचंद्र महाराजांच्या कणकवलीत अशांतता पसरविणाऱ्यांनी कायमच सिंधुदुर्ग पेटता ठेवला, सिंधुदुर्गची बदनामी केली त्या झोटिंगशाही, राडा संस्कृतीला थारा नाही म्हणूनच मतपेटीतून लोक धडा शिकवतील,’ असे केसरकर म्हणाले. तर ‘राणेंसोबत पंधरा वर्षे आमदार म्हणून राहून काम केले पण त्यांनी स्वत:चा विकास केला’, अशी टीका माजी आमदार शंकर कांबळी यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा