महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी (१८ ऑक्टोबर) बारामतीमधल्या पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन केलं. राज ठाकरे यांनी मनसेचे लोकप्रिय नेते वसंत मोरे यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मोर्चेबांधणीची जबाबदारी दिली आहे. तसेच कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे या बारामतीच्या खासदार आहेत. त्यामुळे राज ठाकरेंच्या आदेशावर सर्वात आधी शरद पवार गटाकडून प्रतिक्रिया आली आहे. आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरे यांना इतर पक्षांची मतं फोडण्यापेक्षा महाविकास आघाडीत येण्याचं आवाहन केलं आहे.
आमदार रोहित पवार म्हणाले, “माझं एकच म्हणणं आहे की संविधान टिकावं असं ज्या पक्षाचं मत आहे, त्या पक्षाने भाजपाला सहकार्य करू नये. भाजपा आज ज्या पद्धतीने काम करत आहे, ते संविधानाविरोधात आहे. राज ठाकरे यांना वाटत असेल की संविधान टिकलं पाहिजे तर त्यांनी कुठेतरी विचार करून महाविकास आघाडीबरोबर येण्याचा विचार केला पाहिजे. परंतु, आपले उमेदवार उभे करून त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाजपाला फायदा होत असेल तर याचा त्यांनी विचार करावा आणि खऱ्या अर्थाने आपण कोणत्या बाजूला आहोत ते पाहावं.” रोहित पवार हे टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
हे ही वाचा >> जयंत पाटील अजित पवारांच्या संपर्कात? अमोल मिटकरी म्हणाले, “येत्या ५ दिवसांत…”
शरद पवार गटातील आमदार रोहित पवार म्हणाले, राज ठाकरे यांनी पाहावं की ते मतं फोडण्याच्या बाजूने आहेत की संविधानाच्या बाजूने आहेत. ते जर मतं फोडण्याच्या बाजूने नसतील तर त्यांनी मविआला ताकद देणं जास्त महत्त्वाचं आहे. मी केवळ एक आमदार आहे. त्यामुळे मी राज ठाकरे यांना महिवात येण्याचं आवाहन करू शकत नाही. परंतु, नागरिक म्हणून माझं एकच म्हणणं आहे की जे पक्ष मतं फोडतात. त्यांच्या या क़ृतीमुळे (मतं फोडण्यामुळे) भाजपाला फायदा होतो. असं चित्र आपण याअगोदरही पाहिलं आहे. याबाबत त्या-त्या पक्षाने विचार करावा. भाजपला मदत करायची की संविधानाला मदत करायची हे राज ठाकरे यांनी ठरवावं. संविधान टिकवण्यासाठी मदत करायची असेल तर राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीबरोबर यावं, इंडिया आघाडीबरोबर यावं.