राज्यात आज एकीकडे नागरिक दोन वर्षांनी निर्बंधमुक्त धुळवड साजरी करत असताना दुसरीकडे राजकारणात मात्र गेल्या काही महिन्यांपासून आरोप-प्रत्यारोपांची धुळवड सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत असून यावेळी टीकेचा खालावलेला दर्जा सर्वसामान्यांना आवडलेला नाही. एकीकडे सत्ताधारी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत असताना विरोधकही भ्रष्ट्राचाराची प्रकरणं बाहेर काढत आरोप करत आहेत.
शरद पवारांकडून भाजपाचं कौतुक; नेत्यांना म्हणाले “प्रतिस्पर्धी असले तरी त्यांच्यांकडून…”
दरम्यान राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकीय धुळवडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना उत्तर दिलं असून वाघाचं उदाहरण दिलं आहे. रोहित पवार यांनी यावेळी फेसबुक पोस्टसोबत व्हिडीओदेखील शेअर केला आहे.
रोहित पवार फेसबुक पोस्टमध्ये काय म्हणाले आहेत?
रोहित पवार मुलांसोबत वाघ पाहण्यासाठी गेले होते. यावेळी वाघ दिसल्यानंतर त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून हा क्षण शेअर केला असून यानिमित्ताने राजकीय भाष्यदेखील केलं आहे.
महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले “ज्या क्षणी…”
रोहित पवारांनी पोस्टमध्ये लिहिलंय की, “जंगलातला वाघ बघण्याची गेल्या तीन वर्षांपासूनची मुलांची इच्छा आज काहीशी सवड मिळाल्याने कुटुंबासह पूर्ण झाली. साक्षात वाघ बघून मुलं खूप आनंदी झाली आणि तो आपल्याला घाबरत का नाही?असं विचारलं. मी त्यांना म्हणालो, वाघाला त्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असल्याने तो कुणाला घाबरत नसतो. म्हणूनच आपणही वाघासारखंच राहायचं असतं आणि प्रामाणिकपणे काम करताना कोण काय म्हणतंय याकडं ढुंकूनही बघायचं नसतं. हत्तीसुद्धा रस्त्याने जात असताना आजूबाजूला ओरडणाऱ्यांकडं लक्ष देत नसतो. हे ऐकून मुलंही म्हणाली, “महाराष्ट्रही असाच आहे ना बाबा!”.
भाजपाला पुन्हा येऊ देणार नाही – शरद पवार
राज्यात २०२४ च्या निवडणुकीत पूर्ण बहुमताने सत्तेत येऊ, असा दावा करणाऱ्या भाजपाला महाविकास आघाडीचे निर्माते व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं. राज्यात भाजपला पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, असं प्रतिआव्हान त्यांनी केलं. विधिमंडळातही भाजपाला आक्रमकपणे उत्तर देण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला. पवार यांच्या निवासस्थानी गुरुवारी दोन बैठका झाल्या. सकाळी महाविकास आघाडीचे तरुण आमदार पवार यांना भेटले व सायंकाळी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची त्यांनी बैठक घेतली. पवार यांना भेटणाऱ्या आमदारांमध्ये रोहित पवार, आदिती तटकरे, आशुतोष काळे, धीरज देशमुख, अतुल बेनके, योगेश कदम, इंद्रनील नाईक, ऋतुराज पाटील यांचा समावेश होता. जवळपास दोन तास ही बैठक चालली. यावेळी पवारांनी युवा आमदारांची मतं जाणून घेतली आणि यशस्वी राजकीय वाटचालीसाठी कानमंत्रही दिला. ‘भाजपाकडून होणाऱ्या आरोपांना घाबरू नका, मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ दणार नाही’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपा आपला राजकीय प्रतिस्पर्धी असला तरी त्यांच्या नेत्यांकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी आहेत. परिश्रम घेण्याची तयारी, नियोजन हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.