Rohit Pawar Social Post Viral: विधानसभा निवडणुका नेमक्या कधी होणार? याबाबत अद्याप कोणतीही ठोस अशी घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे राजकीय पक्ष कार्यकर्त्यांबरोबरच मतदारांमध्येही उत्सुकता वाढली आहे. त्याचवेळी दुसरीकडे राजकीय पक्षांमधील जागावाटप व इच्छुकांना उमेदवारी या मुद्द्यांवरही बैठकांचं सत्र सुरू झालं आहे. राज्यातील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमधला एकेक गट सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही बाजूला आहे. त्यामुळे जागावाटपाचा गुंता वाढला असून त्यासंदर्भात आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सूचक पोस्ट शेअर केली आहे.
रोहित पवार यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर यासंदर्भात पोस्ट शेअर केली असून त्यात भारतीय जनता पक्षानं अंतर्गत सर्व्हे केल्याचा दावा केला आहे. भाजपाच्या या अंतर्गत सर्व्हेचे निष्कर्ष आले असून त्यात तिन्ही पक्षांमध्ये कशा आणि किती जागा वाटल्या जाणार आहेत, याबाबत रोहित पवार यांनी दावा केला आहे.
अजित पवार गटाला फक्त ७ ते ११ जागा?
रोहित पवारांनी शेअर केलेल्या या पोस्टनुसार, अजित पवार गटाला फक्त ७ ते ११ जागा जिंकता येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. “एका इंटर्नल सोर्सच्या माहितीनुसार परवाच भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला आहे. त्यामध्ये अजितदादांच्या गटाला ७-११ जागा, शिंदे साहेबांच्या गटाला १७-२२ जागा आणि स्वत: भाजपला ६२-६७ जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत गोटात भीती पसरली आहे. यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत”, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
अजित पवारांना किती जागांची ऑफर?
“भाजपच्या एका मोठ्या केंद्रीय नेत्याने परवा अजितदादांना काही ठराविक जागा ऑफर केल्या असून अजितदादांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदारसंघातच रोखण्यासाठी त्यांच्या विरोधात मोठे नेते उभे केले किंवा अपक्ष उभे करण्याची तयारी दाखवली तर ६ ते ७ जागा अतिरिक्त देण्याचीही ऑफर दिली आहे”, असंही या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
“कर्जत-जामखेड संदर्भात तर ‘कुछ भी कर के, अभी उसे वहीं पे रोको”, असं सांगितल्याने कर्जत-जामखेडची लढत राज्यात सर्वाधिक लक्षवेधी आणि तेवढीच रोचक होणार हे नक्की आहे. पण मीही या महाकाय शक्तीशी दोन हात करायला सज्ज असून या महायुद्धात कर्जत-जामखेडकर स्वाभिमान आणि निष्ठा काय असते, ते या महाशक्तीला दाखवून देतील, असा विश्वास आहे”, असंही रोहित पवारांनी पोस्टमध्ये शेवटी नमूद केलं आहे.