राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे त्यांच्या सडेतोड वृत्तीमुळे चर्चेत असतात. २०१९च्या निवडणूक काळात रोहित पवारांनी मतदारसंघात केलेला आक्रमक प्रचारही चर्चेचा विषय राहिला होता. गेल्या चार वर्षांपासून आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघाप्रमाणेच राजकीय वर्तुळातही आपल्या भूमिका स्पष्टपणे मांडल्याचं दिसून आलं आहे. असं करताना त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि गेल्या आठ महिन्यांपासून एकनाथ शिंदे सरकारवर टीकास्र सोडण्याची एकही संधी सोडलेली नाही. या पार्श्वभूमीवर भाजपामधला कोणता नेता आवडतो, असा प्रश्न एका ट्विटर युजरनं विचारताच रोहित पवार यांनी त्यावर दोनच शब्दांत उत्तर दिलं आहे.
#AskRohitPawar हॅशटॅगवर रंगला प्रश्नोत्तरांचा तास!
९ एप्रिल रोजी रोहित पवार यांनी #AskRohitPawar या हॅशटॅगने नेटिझन्सला स्वत:ला कोणताही प्रश्न विचारायचं आवाहन केलं. त्यांच्या या आवाहनाला नेटिझन्सकडून भन्नाट प्रश्न विचारले जात आहेत. रोहित पवारही त्याला तेवढ्याच मोकळेपणाने उत्तरही देत आहेत. एका युजरनं विलासराव देशमुखांविषयी दोन शब्द सांगण्याचं ट्वीट केल्यावर रोहित पवारांनी त्याला ‘निष्ठा आणि कर्तृत्व’ असं उत्तर दिलं.
कोणतं मंत्रीपद भूषवायला आवडेल? असा प्रश्न एका युजरनं रोहित पवार यांना विचारला असता त्यावर ‘पद महत्त्वाचं नसलं, तरी जिथे युवांच्या हाताला काम देता येईल, असं मंत्रिपद नक्कीच आवडेल’, असं सूचक उत्तर रोहित पवार यांनी दिलं. आजोबा शरद पवारांकडून तुम्हाला काय शिकायला मिळालं? असा प्रश्न एका युजरनं विचारला. त्यावर रोहित पवार यांनी उत्तर देताना ‘गरम वातावरणात डोकं कसं शांत ठेवलं पाहिजे’, असं ट्वीट केलं.
घरून पळून जाण्यासाठीही विचारला सल्ला!
एका युवतीनं तर आपलं एका तरुणावर प्रेम असून घरचे लग्नाला तयार नाहीत, तर दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतलाय, तुमच्यामते मी काय करायला हवं? असा प्रश्न विचारला असता ‘पळून जाण्यासाठी आई-वडिलांनी सहमती दिली असेल तर ते म्हणतात तसं नक्की करा!’ असा सल्ला रोहित पवार यांनी दिला.
दरम्यान, या आवाहनावर जसे वैयक्तिक प्रश्न आले, तसेच राजकीय प्रश्नदेखील आले. त्यातल्याच एका युजरनं रोहित पवार यांना भारतीय जनता पक्षातला कोणता नेता आवडतो? असा प्रश्न विचारला. विरोधी पक्षातल्या नेत्याविषयी बोलताना कोणताही आढावेढा न घेता रोहित पवारांनी ‘गडकरी साहेब’ असं दोन शब्दांत उत्तर देत नितीन गडकरी यांचं नाव घेतलं!
दरम्यान, रोहित पवारांना विचारलेले प्रश्न आणि त्यावर त्यांनी दिलेली उत्तरं सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.