सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणामध्ये अनेकदा खालची पातळी गाठल्याची टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका विधानाची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार संतप्त झाले असून त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून चंद्रकांत पाटील यांना टॅग करत टीकास्र सोडलं आहे.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
चंद्रकांत पाटील यांचा गुरुवारी पुण्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यामुळे पुणे भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना सत्कार करण्यात आला. यावेळी आपल्या भाषणात चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे.
आपल्या भाषणात चंद्रकांत पाटील यांनी हातकणंगले मतदारसंघातली निवडणूक आणि त्यावेळी झालेल्या आरोप-प्रत्यारोपांविषयी भाष्य केलं. “हातकणंगल्यात रोज उठून राजू शेट्टी मोदींना शिव्या द्यायचे. माझे खूप चांगले मित्र आहेत. म्हटलं तुम्ही चूक करताय. परवा आपल्या एका केंद्रीय नेत्याची आणि त्यांची भेट झाल्यानंतर ते म्हणाले की दादांनी मला संपवलं. ते केंद्रीय नेते ४० वर्ष माझ्याशी जोडलेले असल्याने म्हणाले की दादा कोणाला संपवत नाही. आई-वडिलांना शिव्या द्या चालेल. ते म्हणतील जाऊ दे. आईवरुन शिव्या देणं आमची कोल्हापूरची पद्धत आहे. पण दादा (चंद्रकांत पाटील) मोदी आणि शाहांना शिव्या देणं सहन करु शकत नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
चिन्ह गोठवल्यास शिंदे गटाचा ‘प्लॅन बी’ काय? रामदास कदम म्हणाले, “यांना माहिती नाही की…”
रोहित पवारांचं टीकास्र
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या या विधानावरून रोहित पवार यांनी ट्वीटरवरून टीकास्र सोडलं आहे. “आदरणीय चंद्रकांतदादा, तुमच्या नेत्यांचा आदर सर्वांनाच आहे. पण आपल्या नेत्यांचे गुणगाण गाताना कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्राच्या संस्कृतीची बदनामी होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. यामुळे सध्या खालावणाऱ्या राजकीय पातळीला काही स्तर आहे की नाही, असा प्रश्न मला पडतो”, असं रोहित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
रोहित पवार यांच्याप्रमाणेच राजकीय वर्तुळातून चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.