राज्यात महाविकासआघाडीचं सरकार सत्तेवर आल्यापासून प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजपा आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सातत्याने सुंदोपसुंदी सुरू आहे. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप करणे, नेतेमंडळींना लक्ष्य करणे हे प्रकार सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी “मला माजी मंत्री म्हणून नका, दोन दिवसांत बघा काय होतंय”, अशा आशयाचं सूचक विधान केलं होतं. त्यावरून बरीच राजकीय चर्चा आणि तर्क वितर्क झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटील यांना उद्देशून खोचक टोला लगावला आहे. रुपाली चाकणकर यांनी केलेल्या ट्वीटमधून चंद्रकांत पाटील यांच्यावर करमणूक कर देखील लावण्याची मागणी केली आहे!
काय आहे ट्वीटमध्ये?
या ट्वीटमध्ये रुपाली चाकणकर म्हणतात, “चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं एक गोड स्वप्न आहे कारण त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सध्या निखळ मनोरंजन होत आहे. महाराष्ट्राचे वित्तमंत्री म्हणून अजित दादांना माझी विनंती आहे, की त्यांनी चंद्रकांत दादांवर करमणूक कर लावावा”, असं चाकणकर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
“निदान सरकारचा भार हलका होईल!”
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्यावर करमणूक कर लावल्यामुळे सरकारचा भार हलका होईल, असं रुपाली चाकणकर या ट्वीटमध्ये म्हणाल्या आहेत. “केंद्रातील भाजपा सरकार महाराष्ट्राचे हक्काचे जीएसटीचे पैसे देत नाही. निदान त्यांच्यावरील (चंद्रकांत पाटील) करमणूक करामुळे सरकारचा काही भार तरी हलका होईल”, असं यात म्हटलं आहे.