राज्यात महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहाता राज्य महिला आयोगावर लवकरात लवकर महिला अध्यक्षांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. विशेषत: विरोधी पक्षाकडून या मागणीचा वारंवार पुनरुच्चार केला जात असताना अजून देखील राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद गेल्या दोन वर्षांपासून रिक्तच आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं नाव या पदासाठी चर्चेत येऊ लागलं आहे. मात्र, यावरून आता विरोधक आणि सत्ताधारी पक्षात जुंपल्याचं पाहाययला मिळत आहे. विशेषत: चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यामध्ये या मुद्द्यावरून कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. चित्रा वाघ यांनी आज सकाळीच केलेल्या एका ट्वीटमुळे याची सुरुवात झाल्याचं बोललं जात आहे.
चित्रा वाघ यांचा अप्रत्यक्ष निशाणा?
भाजपा महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आज सकाळीच एक ट्वीट करून या मुद्द्याला तोंड फोडलं आहे. रुपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा सुरू असताना चित्रा वाघ यांचं हे ट्वीट थेट चाकणकर यांच्यावरच अप्रत्यक्ष निशाणा असल्याचं बोललं जात आहे. “महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका. अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल,” असं चित्रा वाघ यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
“क्षुल्लक गोष्टींवर लक्ष द्यायला वेळ नाही”
दरम्यान, चित्रा वाघ यांच्या ट्वीटवर रुपाली चाकणकर यांनी देखील थेट टीका न करता अप्रत्यक्ष शब्दांतच निशाणा साधला आहे. “करोनाच्या पार्श्वभूमीवर खूप मोठे प्रश्न आहेत. आत्ता कुठे राज्यातली जनता सावरतेय. अनेक मोठे प्रश्न असताना इतर क्षुल्लक गोष्टींवर लक्ष द्यायला वेळ नाही. एक जबाबदार नागरीक म्हणून आपली भूमिका निभावणं महत्त्वाचं आहे”, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.
“रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका,” चित्रा वाघ यांचा रुपाली चाकणकरांवर अप्रत्यक्ष निशाणा
“महिला सुरक्षिततेवर आमचं लक्ष केंद्रीत आहे. महिला सबलीकरण, सक्षमीकरणावर आमचं लक्ष आहे. त्यामुळे आम्ही इतर गोष्टींकडे लक्ष देत नाही. मी राज्याच्या महिला संघटनेची अध्यक्ष म्हणून काम करत आहे”, असं देखील रुपाली चाकणकर म्हणाल्या.