लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. १६ सप्टेंबरला सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. दरम्यान सुरेखा पुणेकर यांच्या पक्षप्रवेशावरुन विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे अशी टिपण्णी दरेकरांनी केली आहे. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसनेही उत्तर दिलं आहे.
प्रवीण दरेकरांनी काय म्हटलं –
आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात रामोशी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना प्रवीण दरेकरांनी सुरेखा पुणेकरांचं नाव न घेता टीका केली. “राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे,” असा टोला प्रवीण दरेकरांनी यावेळी लगावला. “या पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे,” अशी टीकाही यावेळी त्यांनी केली होती.
बिग बॉसच्या माजी स्पर्धक अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करणार प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसचं उत्तर –
प्रवीण दरेकरांच्या या टीकेला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी उत्तर दिलं आहे. “आपल्या बोलण्यातून वैचारिक दारिद्र्य दिसून येत असून संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. आपल्या पक्षातील काही महिला बाहेर फिरताना आपण महिलांचा कैवारी आहोत दाखवण्याचा प्रयत्न करतात, आज मला त्यांची कीव येते. तुमच्या बोलण्यामुळे तुमच्या पक्षाची काय संस्कृती आहे ती दिसून आली. प्रवीण दरेकर तुम्ही ज्या प्रकारचं वक्तव्य केलं त्याबद्दल तुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष महिलांचा अपमान करणाऱ्यांचं गाल आणि थोबाड रंगवून दाखवू शकतं,” असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.
सुरेखा पुणेकर करणार अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश
सुरेखा पुणेकर १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. यासंदर्भातील माहिती सुरेखा पुणेकर यांनीच एका व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. “चित्रपट, कला, साहित्य, संस्कृतिक विभाग मुंबई अध्यक्ष मनोज व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या १६ सप्टेंबरला मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे. आतापर्यंत मी कलेची सेवा केली आता मला राजकारणात जनतेची सेवा करायची आहे, महिलांचे प्रश्न सोडवायचे आहेत. गोरगरिबांचे प्रश्न सोडवायचे आहेत. १६ सप्टेंबरला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहे,” असं सुरेखा पुणेकर यांनी म्हटलं आहे.