डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच देशाची वाटचाल योग्यरितीने चालली सुरु होती. मात्र आज या संविधानावर घाला घातला जात आहे. मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आले तर २०२२ साली संपूर्ण संविधान बदलून टाकतील, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे.
मंगळवारी औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संविधान बचाव महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात धनंजय मुंडे यांनी भाजपावर टीका केली. या सरकारने पहिला हल्ला तुमच्या चुलीवर केला. मांसाहार आणि शाकाहारी अशी विभागणी या सरकारने केली. सरकार विरोधात आवाज उठविणाऱ्या विचारवंतांच्या हत्या झाल्या. या हत्या म्हणजे संविधानाची हत्या होती. यानंतर काही वृत्तवाहिनीच्या पत्रकारांनी सरकारची पोलखोल केली म्हणून त्यांना घरी बसवण्यात आले. पत्रकारांची मुस्कटदाबी होते असून संविधानाने दिलेला बोलण्याचा अधिकार हिरावून घेण्यात येत आहे. म्हणून संविधान वाचवण्यासाठी आज धडपड करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
संविधानाने आपल्याला हक्क आणि अधिकार दिले, तेच आज संकटात आहे. १९५० साली अस्तित्वात आल्यापासून संविधान वाचवण्याची भाषा देशात कधीही झाली नव्हती, मात्र आजच्या राज्यकर्त्यांमुळे संविधान वचवा असं म्हणण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
या देशातील जनताच लोकशाही वाचवेल, मतदानाचा मोठा हक्क जनतेच्या हातात आहे. त्यांनी त्याचा योग्य वापर करून या सरकारला धडा शिकवावा, असे आवाहन त्यांनी केले.
फौजिया खान यांनी देखील सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. आज देशात महागाई प्रचंड वाढली आहे, सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले असून म्हणूनच आज जनता म्हणत आहे की, “महंगाई पोहोची हद्द के पार, नको रे बाबा मोदी सरकार”. जनता राज्यातील प्रश्नांना कंटाळली असताना सत्ताधारी मात्र खोटा प्रचार करत आहेत. सरकार हम करे सो कायदा अशा पद्धतीने काम करत आहे. आपल्या संविधानाचा पायाच ढासळण्याची भीती आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेस याविरोधात मोठे आंदोलन उभारेल, असे त्यांनी सांगितले.