Fahad Ahmad From Anushakti Nagar : राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने आज नवी यादी जाहीर केली. आजच्या यादीत ९ जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्री स्वरा भास्करचा पती फहाद अहमद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नवाब मलिक यांची लेक सना मलिक यांच्याविरोधात ते उभे ठाकले आहेत. अनुशक्तीनगर येथून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुरुंगातून सुटून आल्यानंतर नवाब मलिक यांना महायुतीने नाकारले. त्यामुळे अजित पवारांच्या बाजूने गेलेले नवाब मलिक एकटे पडले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. परंतु, त्यांची मुलगा सना मलिक यांना उमेदवारी देऊ केली. दरम्यान, नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे ते आता मानखुर्द शिवाजी नगर येथून उभे राहणार आहेत. तर, सना मलिक यांच्याविरोधात शरद पवारांनी फहाद अहमद यांना उमेदवारी दिली.

हेही वाचा >> शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंच्या विरोधात दिला ‘हा’ तगडा उमेदवार

फहाद अहमदबद्दल जयंत पाटील काय म्हणाले?

“ते उच्च शिक्षित असून मुस्लीम तरुण आहेत. त्यांनी टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्समध्ये अभ्यास केला आहे. ते चांगले अॅक्टिव्हिस्ट असून देशभर त्यांचं चांगलं नाव आहे. ते आधी आमच्या पक्षात नव्हते. ते पूर्वी समाजवादी पक्षात होते. चर्चा करून आम्ही त्यांना आमच्या पक्षात घेतलं असून त्यांना निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.

फहाद अहमद काय म्हणाले?

“समाजवादापेक्षा आमची वेगळी विचारधारा नाही. मला उमेदवारी देण्याबाबत शरद पवारांनी अखिलेश यादव यांना विचारलं याबाबत मी शरद पवारांना धन्यवाद देतो”, असं फहाद अहमद म्हणाले.

फहाद अहमद कोण?

फहाद अहमद हे समाजवादी पार्टीची युवा संघटनेचे मुंबई आणि महाराष्ट्र भागातील अध्यक्ष होते. त्यांनी आजच राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या उमेदवारीची चर्चा होती. त्यामुळे बरेच दिवस ते महाविकास आघाडीच्या बैठकांमध्येही दिसत होते. आज अखेर त्यांनी शरद पवारांना जाहीर समर्थन दिलं असून त्यांना अनुशक्तीनगर येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar announce fahad ahmad husband of swara bhaskar from anushakti nagar maharashtra assembly elections 2024 sgk