विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. तसंच या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समितीही गठीत करण्यात आली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना फोन करुन संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती घेतली आहे. एबीपी माझाने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
शरद पवार यांनी अजित पवार यांना फोन करुन सभागृहात नेमकं काय घडलं होतं याची सविस्तर माहिती घेतली आहे. जयंत पाटील यांचं निलंबन करण्यात आलं तेव्हा अजित पवारही सभागृहात उपस्थित होते. निलंबनाच्या कारवाईनंतर त्यांनी सभात्याग केला होता.
दरम्यान अजित पवार यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा उल्लेख करत राज्य सरकारवर टीका केली. जयंत पाटील अध्यक्षांना निर्लज्ज म्हणाले नाहीत असा दावा यावेळी त्यांनी केला.
“जयंत पाटील गेल्या ३२ वर्षांपासून सभागृहाचे सदस्य असून, त्याचं वागणं, बोलणं, कारकिर्द सर्वांनी पाहिली आहे. ते काही अध्यक्षांना निर्लज्जासारखं काम सुरु आहे म्हणाले नाही. मी पण ३०-३२ वर्षं काम करत आहे. अनेकदा आपण सरकारला काही लाज आहे की नाही म्हणत असतो. सरकार निर्लज्जासारखं वागत आहे अशी विधानं सभागृहात करण्यात आली आहेत. पण हे फार सोयीचं राजकारण करतात,” अशी टीका यावेळी अजित पवारांनी केली.
पुढे ते म्हणाले की “छगन भुजबळ यांनी मुंबई सोन्याचं अंडं देणारी कोंबडी समजतात असं विधान केल्याने इतका गोंधळ घालण्यात आला. पण याआधी विरोधी पक्षनेते म्हणून फडणीसांनी काम पाहिलं तेव्हा मुंबईला सोन्याची कोंबडी अशी उपमा दिली होती. सागर म्हणून आमदार आहेत त्यांनी तशीच उपमा दिली आहे. प्रवीण दरेकरांनीही तसा उल्लेख केला होती. यांची लोकं बोलली की सगळं योग्य आणि विरोधी पक्ष म्हणून आमच्यातील काही सहकारी बोलले की सत्तेच्या, बहुमताच्या जोरावर कामकाज थांबवायचं. मग माफी मागा, दिलगिरी व्यक्त करा अशा वल्गना करणं हे योग्य नाही”.
विधानसभेत नेमकं काय घडलं होतं?
दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणाच्या चौकशीची घोषणा गृहमत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आपल्यालाही बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. मात्र शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना बोलू देण्यास अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी परवानगी नाकारली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य अध्यक्षांच्या आसनासमोर धावले. त्यांनी आम्हालाही बोलू द्या, अशी मागणी केली. परंतु, अध्यक्षांनी कामकाज पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. त्यावर आक्षेप घेताना संतप्त झालेल्या जयंत पाटील यांनी विरोधकांना तुम्ही बोलू देत नाही, असे सांगत तुम्ही असला निर्लज्जपणा करू नका, असे अध्यक्षांना सुनावले. त्यामुळे पाटील यांच्या निलंबनासाठी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी दीड तास कामकाज रोखून धरले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड संतापले. त्यांनी जयंत पाटील यांना आताच्या आता निलंबित करा, अशी मागणी केली. त्यावेळी उडालेल्या गदरोळात सभागृहाचे कामकाज पुन्हा तीनवेळा दीड तासांसाठी तहकूब करण्यात आले.
कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याचा तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी आचरण आणि नितीमुल्य समिती गठीत करण्याचा ठराव मांडला. तो बहुमताने मंजूर करण्यात आला.