राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे कोणतीही राजकीय समीकरणं ही कायमस्वरूपी नसल्याचंच चित्र निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदेंसमवेत शिवसेनेचा मोठा गट फुटून बाहेर पडल्यामुळे राज्यात सत्ताबदल झाला. त्यानंतर महाविकास आघाडी एकत्र राहणार की विभक्त होणार? यावर चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे शरद पवार समविचारी पक्षांनी एकत्र राहावं या भूमिकेचा सातत्याने पुनरुच्चार करत असताना उद्धव ठाकरेंनी संभाजी ब्रिगेडसोबत युतीची घोषणा करून महाविकास आघाडी फुटण्याच्या चर्चांना अधिकच हवा दिल्याचं बोललं जात आहे. मात्र, दुसरीकडे शरद पवार अजूनही पंतप्रधान होऊ शकतात, असा दावा करणाराही एक गट आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द शरद पवारांनीच त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीविषयी खुलासा केला आहे.
पवारांनी मोरारजी देसाईंचं दिलं उदाहरण!
शरद पवार यांनी सोमवारी ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकार आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवारांना पुढील राजकीय वाटचालीविषयी विचारणा केली असता त्यांनी मोरारजी देसाईंचं उदाहरण देत आपल्या वाटचालीबाबत खुलासा केला आहे. “मी आता कोणत्याही प्रकारची सत्तेची जबाबदारी घेणार नाही. माझं वय ८२ आहे. मोरारजी देसाई भाग्यवान होते. ते ८२व्या वर्षी पंतप्रधान झाले. मोरारजींचा कित्ता मी काही चालवू इच्छित नाही”, असं शरद पवार यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितलं आहे.
“या देशातल्या सामान्य लोकांच्या यातना, समस्या सोडवण्यासाठी विविध राजकीय विचारांच्या लोकांना हातभार लावावा हे सूत्र माझं आहे. मी आता सत्तेची जबाबदारी घेणार नाही”, असं शरद पवार म्हणाले.
महाविकास आघाडीचं काय होणार?
दरम्यान, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मविआ विभक्त होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मविआ एकत्र लढवणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावर शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. “आम्ही आगामी निवडणुकांना एकत्रपणे सामोरं जावं किंवा त्या स्वतंत्रपणे लढवाव्यात याविषयी चर्चा करत आहोत. आमच्या पक्षात त्यावर विचार सुरू आहे. पण निर्णय झालेला नाही. माझं व्यक्तिगत मत असं आहे की देशात लोकांना जर पर्याय द्यायचा असेल, तर समविचारी, समान कार्यक्रमावर विश्वास असणारे लोक एकत्र आले तर योग्य होईल”, असं पवार म्हणाले.