लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोज लागत आहे. केंद्रात फिर एक बार मोदी सरकार येणार की इंडिया आघाडी धक्का देणार याची चर्चा देशभरात असताना महाराष्ट्रात मात्र ४ जून नंतर कोण कोणत्या पक्षात जाणार? ही चर्चा जोर धरू लागली आहे. शरद पवार गटाचे युवक नेते महेबुब शेख यांनी काल (दि. ३१ मे) अजित पवार गटाच्या संभाव्य फुटीबाबत विधान केले होते. त्यानंतर आज अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनीही खळबळजनक दावा केला आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे ४ जूननंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. या दाव्याला भाजपा नेते प्रवीण दरेकर आणि शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दुजोराही दिला आहे.
शरद पवार गट रिकामा होणार
सूरज चव्हाण यांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन सोहळा साजरा होणार असल्याची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, “१० जून रोजी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत शरद पवार गटातील अनेक नेत्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. याचबरोबर अजित पवारांवर विश्वास ठेवून अनेक ज्येष्ठ नेते पक्षात येणार आहेत. ४ जूनच्या निकालानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुद्धा काँग्रेसमध्ये जाणार आहेत. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची वेळही मागितली आहे. त्यांचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरलेला आहे. ४ जूननंतर शरद पवार गट रिकामा होणार आहे.”
“जयंत पाटील यापूर्वीच भाजपा किंवा काँग्रेसमध्ये जातील, असे चित्र होते. सूरज चव्हाण यांच्या दाव्यात तथ्य आहे. शरद पवार गटाचे राजकीय भविष्य जयंत पाटील यांना चांगले माहीत आहे, त्यामुळे ते पक्ष बदलण्याचा निर्णय घेऊ शकतात”, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
रोहित पवारांच्या हाताखाली जयंत पाटील काम नाही करणार
सूरज चव्हाण आणि प्रवीण दरेकर यांच्याप्रमाणेच शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनीही जयंत पाटील यांच्यावर भाष्य केले. “राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात अनेक उलथापालथी होणार आहेत. ज्यांनी शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याबरोबर काम केले. त्यांना आता रोहित पवारांचे ऐकावे लागत आहे. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हुकूमशाही पद्धतीने काम करत आहेत. रोहित पवारांमुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा एक पाय पक्षाबाहेर आहे. त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. उबाठा गटाची जी गत झाली, तीच आता शरद पवार गटाची होताना दिसत आहे”, अशी टीका संजय शिरसाट यांनी साम वृत्तवाहिनीशी बोलताना केली होती.