नागपूरमधील हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या रेशीम बाग येथील मुख्यालयात गेले होते. त्यांच्या या भेटीमुळे अधिवेशनात अनेक आमदारांनी वेगवेगळी प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे संघाच्या मुख्यालयात जात असताना अजित पवार गटाने मात्र त्यापासून अंतर ठेवले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. “नागपूरमध्ये भाजप-आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय? यावर मंथन झाले. या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असे ठरवण्यात आले. ज्यांच्यावर आरोप आहेत; ज्यांच्यावर डाग आहेत. त्यांना सोबत घेऊ नये, असे ठरविण्यात आले”, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी एक्स या सोशल मीडिया साईटवर पोस्ट करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर दावा केल्यानंतर टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना आपली भूमिका सविस्तर मांडली. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले होते की, “ज्यांना राजकारण समजते; ज्यांना राजकीय जाण आहे. त्यांना लगेच समजले असेल की, महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे, त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी. महाराष्ट्रात पुढे काय होईल, हे सांगता येत नाही.”

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, भाजपाचा मूळ मतदार हा भ्रष्ट नेत्यांवर रागावलेला होता. २०१४ साली या मतदारांनी भाजपाला पूर्ण ताकदीनिशी सत्ता आणून दिली. भाजपाचा वैचारिक अधिष्ठान असलेला मतदार आता भाजपापासून दूर जाऊ लागला आहे. त्यामुळे यापुढे निवडणूक लढवायची असेल तर कमळाच्या चिन्हावर लढवावी, असा एक मतप्रवाह संघ आणि भाजपात आहे. खासकरून पुण्याची पोटनिवडणूक झाली, त्यानंतर या विचाराला अधिक बळ मिळाले.
हे वाचा >> “आमच्याकडे कोण मुख्यमंत्री होईल सांगता येत नाही”, देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी; सभागृहात हशा!
संघ-भाजपा काय काँग्रेस-राष्ट्रवादी नाही
“संघ आणि भाजपाचे लोक निवडणूक झाल्यानंतर लगेचच पुढच्या निवडणुकीची तयारी करत असतात. त्यामुळे त्यांचे सर्व्हे झाले आहेत, सर्व्हेतील शिफारशींचा अभ्यास झाला आहे. ते अभ्यासवर्ग घेऊन निवडणुका लढतात. आम्ही निवडणुका झाल्यानंतर अभ्यास करतो. त्यामुळे संघ आणि भाजपा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी नाही”, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी टीव्ही ९ शी बोलताना दिली. महायुतीमधील भाजपातेर खासदार हे कमळ चिन्हासाठी आग्रही आहेत, असा गौप्यस्फोटही जितेंद्र आव्हाड यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वयंसेवक होते
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संघ मुख्यालयात का गेले? याची मला कल्पना नाही. पण ते शिवसैनिक होण्याअगोदर स्वयंसेवक होते, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला. ते संघ शाखेत जात होते, असेही आव्हाड म्हणाले.