Mehboob shaikh criticized Ajit Pawar NCP Group: आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय पक्ष तयारीला लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनीही कंबर कसली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने काही दिवसांपूर्वीच जनसन्मान यात्रेची सुरुवात करत महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभा घेण्यास सुरुवात केली असून विकासाचा अजेंडा घेऊन ते लोकांसमोर जात आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आज शिवनेरी येथून शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात केली आहे. त्यानिमित्त झालेल्या सभेत शरद पवार गटाच्या नेत्यांनी अजित पवार गटावर टीकास्र सोडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलिबाबा आणि ४० चोर तिकडे राहिले

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी आपल्या भाषणात अजित पवार गटावर टीका केली. “लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटातील नेत्यांना परतीचे डोहाळे लागले आहेत. ४२ आमदार गेले, त्यापैकी निलेश लंके लोकसभेपूर्वीच परत आले. जे आधीच परत आले, त्या सर्वांचे स्वागत आहे. पण जे ४१ राहिले आहेत, ते अलिबाबा आणि ४० चोरांची टोळी आहे. त्यामुळे या लोकांना आता परत घेऊ नका”, अशी मागणी शेख यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपल्या भाषणातून केली.

हे वाचा >> Maharashtra News Live : “लाडकी बहीण, लाडका भाऊ म्हणता; मग शेतकरी काय सावत्र आहे का?” अनिल देशमुखांचं टीकास्र; इतर घडामोडी वाचा एका क्लिकवर…

ज्या सापांना २० वर्ष दूध पाजलं

महेबुब शेख पुढे म्हणाले, “अजित पवार गटाने काढलेली जनसन्मान यात्रा नसून ती जनअपमान यात्रा आहे. तुम्ही जनतेचा अपमान केला. आज नागपंचमीचा सण आहे. आज सापाला दूध पाजले जाते. या सणानिमित्त एकच दिवस सापाला दूध पाजले जाते. पण पवार साहेबांनी ज्या सापांना २०-२० वर्ष दूध पाजले, त्या सापांनी पवार साहेबांना जेव्हा गरज होती. तेव्हा फणा काढून दंश मारण्याचे काम केले. या नेत्यांनी फक्त पक्ष फोडला नाही तर चोरला आहे.”

लाडकी बायको नसते, तर बहिणच लाडकी असते

“अजित पवार गटाला बहिणीचे महत्त्वच आधी माहीत नव्हते. पण बारामतीच्या जनतेने लोकसभा निवडणुकीत दाखवून दिले की, लाडकी बायको नसते, तर बहिणच लाडकी असते. म्हणूनच आता त्यांना बहिणीचे महत्त्व समजले असून लाडकी बहीण योजना रेटली जात आहे”, अशीही टीका महेबुब शेख यांनी केली.

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे केव्हा खात्यात जमा होणार? अजित पवारांनी जाहीर केली तारीख

अजित पवार गटाकडून धोरणात बदल

दरम्यान अजित पवार गटाकडून आपल्या धोरणात बदल केल्याचे दिसून येत आहे. विधानसभेच्या प्रचारासाठी नवी एजन्सी नियुक्त केल्यानंतर अजित पवार गटाने गुलाबी रंगापासून ते प्रचाराच्या शैलीत बदल केले आहेत. अजित पवार गटाच्या जनसन्मान रॅलीमध्ये शरद पवार किंवा शरद पवार गटाच्या नेत्यावर टीका टाळली जात आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि सरकारच्या इतर योजनांचा प्रचार करण्यावर भर दिला जात आहे. आम्ही विकासासाठी मत मागत आहोत, आम्हाला टिका-टिप्पणी करायची नाही, अशी भूमिका अजित पवार यांनी घेतल्याचे दिसत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar faction leader mehboob shaikh slams ajit pawar group on reference to nag panchami kvg