बारामती लोकसभेत येत असलेल्या इंदापूर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहू नये, अशा धमक्या काही जणांकडून देण्यात आल्या होत्या. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या देण्यात आल्या. अनेक गावांमध्ये जेवण ठेवण्यात आलं. तरीही इथल्या स्वाभिमानी जनतेने त्या धमक्यांना भीक न घालता सभेला हजेरी लावली. इंदापूर, बारामतीमधील जनता केंद्रातील नेते असू द्या किंवा भाजपाची लोक असू द्या त्यांना घाबरत नाही. कदाचित नेता एकवेळेस घाबरेल पण जनता कुणालाही घाबरत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अतुल भातखळकरांना ईडीचा फोन आला असावा

दिल्लीचे अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांचा नंबर लागणार असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, त्यांना कुणाचा फोन आला असावा किंवा त्यांना कुणी सांगितलं असावं, याची मला माहिती नाही. मात्र ज्या लोकांना भाजपा घाबरते, त्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. याआधी शरद पवारांनाही ईडीने नोटीस दिली होती, त्यानंतर काय झालं, हे पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. संजय राऊत यांनाही काही दिवस अटकेत ठेवले होते. पण आताही ते भाजपाविरोधात लढत आहेत. भातखळकरांच्या ट्विटवरून कारवाई झाली, तरी लोक भाजपाला पाठिंबा देणार नाहीत.

मुंबईतील ‘या’ प्रसिद्ध महाविद्यालयात पियुष गोयल यांच्या मुलाच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांवर जबरदस्ती, ओळखपत्र जप्त करून…

रोहित पवार पुढे म्हणाले की, भाजपा कुणावर कारवाई करेल, याबाबत काहीही सांगता येत नाही. कर्नाटक मधील दोन शेतकरी ज्यांना घर नाही, अशा शेतकऱ्यांवरही कारवाई झाली आहे. पण पवार कुटुंबामध्ये विचारांना किंमत आहे. त्यामुळेच मी आणि युगेंद्रने आजोबांची साथ देण्याचा निर्णय घेतला.

टप्प्याटप्प्याने सर्वांचा करेक्ट कार्यक्रम करू

इंदापूर येथील शेतकरी मेळाव्यात अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका करण्यात आली. मात्र हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत कोणतेही भाष्य करण्यात आले नाही, यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, एकाच भाषणात सर्व बोललं तर पुढच्या भाषणात बोलायला काही उरणार नाही. पुढच्या भाषणासाठी काही गोष्टी राखून ठेवल्या आहेत. टप्प्याटप्प्याने सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम करू, अशी सूचक प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.

मनोज जरांगे पाटील यांना तडीपार करणार का? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

विजय शिवतारे लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार

विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात शड्डू ठोकला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही प्रसंगी विरोध करू पण लोकसभा लढवूच, असा आक्रमक पवित्रा विजय शिवतारे यांनी घेतला आहे. यावर रोहित पवार यांनी भाजपाकडे अंगुलीनिर्देश केला. विजय शिवतारे सत्तेतल्या पक्षाचे नेते आहेत. मुख्यमंत्र्यांचेही जर ते ऐकत नसतील तर भाजपाच्या चाणक्याचे ते ऐकणार का? असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला. तसेच विजय शिवतारे ‘नमो विचारमंच’ या नावाखाली निवडणूक लढवित असल्यामुळे ते लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar faction mla rohit pawar big statement on indapur taluka politics lok sabha election 2024 rno news kvg
Show comments