राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो लि. कारखान्यावर काही दिवसांपूर्वी ईडीने धाड टाकून चौकशी केली होती. याबद्दल रोहित पवार यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी पाचारणही करण्यात आले होते. त्यानंतर आज ईडीने मोठी कारवाई केली आहे. ‘बारामती ॲग्रो लि.’ कंपनीची मालकी असलेल्या ‘कन्नड सहकारी कारखाना लि.’ या कारखान्याची १६१.३० एकर जमीन, प्लांट, यंत्र आणि इमारत इत्यादींवर जप्तीची कारवाई केली आहे. या संपत्तीची एकूण रक्कम ५०.२० कोटी असल्याचे ईडीने सांगितले आहे. या कारवाईनंतर रोहित पवार यांनीही एक्स अकाऊंटवर पोस्ट टाकत याबाबत भूमिका व्यक्त केली आहे. तसेच भाजपामध्ये जायला हवं का? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“जयंत पाटील पक्षातून गेले तर…”, आमदार सुनील शेळकेंचा रोहित पवार, जितेंद्र आव्हाडांबाबत मोठा दावा

ईडीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट टाकून याबाबत भाष्य केले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून ‘बारामती ॲग्रो लि.’कडे अनधिकृतपणे ‘कन्नड सहकारी कारखाना लि.’ या कारखान्याची मालकी दिली गेली, असा आरोप ईडीने केला आहे.

या कारवाईनंतर रोहित पवार यांनीही त्यावर पलटवार केला आहे. “माझ्या वाढदिवसाच्या दिवशीही दुसऱ्या एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी ही कारवाई करण्यात आली. पण मी महादेवाचा भक्त आहे, अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेंव्हा अनेकांच थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही”, अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे. त्यावर #लडेंगे_जितेंगे असा हॅशटॅग रोहित पवार यांनी दिला आहे.

“माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत! या कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, असं दिसतंय”, असंही रोहित पवार म्हणाले.

“माझ्या कंपनीवर ईडीने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का?”, अशी प्रतिक्रिया देऊन रोहित पवार यांनी स्माईलीची इमेज टाकली आहे. पण भाजपाने लक्षात ठेवावं…. झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू! माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत! या कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, हेही दिसतंय”, असेही रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार पुढे म्हणाले, “ही कारवाई पूर्णतः बेकायदा असून याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, त्यामुळं कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करु नये. पण प्रश्न इतकाच आहे की, अशी कारवाई केवळ माझ्याविरोधातच का? पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आज तरी असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही! वाढदिवसाच्या दिवशीही अशाच एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई.. परंतु मी महादेवाचा भक्त आहे… अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेंव्हा अनेकांच थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar faction mla rohit pawar tweet after ed action on baramati agro ltd kvg