राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या महिला संघटनेचा राज्यस्तरीय भव्य ‘नारी निर्धार मेळावा’ मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात संपन्न झाला. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली. तसेच सभागृहात उपस्थित असलेल्या महिला कार्यकर्त्या ‘अजितदादा भावी मुख्यमंत्री’ असा मजकूर असलेल्या टोप्या घालून आलेल्या दिसल्या. या मेळाव्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने मात्र अजित पवारांवर खोचक टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर ही टीका करण्यात आली आहे.
जे स्वतःच्या पक्षाचे झाले नाहीत ते..
“भावी मुख्यमंत्री समोरच्या गर्दीत भविष्यातील मुख्यमंत्री पदाची आशा शोधताना दिसत आहेत, जे स्वतःच्या पक्षाचे झाले नाहीत ते विरोधकांच्या बगलेत बसून भविष्याचं स्वप्न पाहत आहेत. तीच बगल घट्ट करत कधीही सरकार तुमचाच घात करेल सांगता यायचं नाही बुवा; अजूनही वेळ गेलेली नाही दादा; नागपूरच्या संत्र्याचा केशरी गोडवा, तुमचीच कारकीर्द आंबट करण्याआधी सावध व्हा”, अशी टीका या ट्विटमध्ये करण्यात आली आहे.
या पोस्टसह महिला मेळाव्यामधील एक व्हिडिओ क्लिप जोडण्यात आली आहे. यामध्ये अजित पवार संपुर्ण सभागृहात दृष्टिक्षेप टाकताना दिसत आहेत. त्यामुळेच मजकुरात “भावी मुख्यमंत्री समोरच्या गर्दीत भविष्यातील मुख्यमंत्री पदाची आशा शोधताना दिसत आहेत”, असा टोला लगावण्यात आला आहे. तसेच अजित पवारांच्या फोटोखाली ‘अपना टाईम आयेगा’, असे कॅप्शनही लिहिण्यात आले आहे.
अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. त्यांनी याआधी यावर अनेकदा भाष्य केलेले आहे. मुख्यमंत्रीपदाची आशा बाळगण्यात काहीही गैर नाही, असे ते म्हणाले आहेत. तसेच २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काँग्रेसपेक्षा अधिक आमदार निवडून आले होते. तेव्हाच मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे घ्यायला हवे होते, अशी सल अजित पवार यांनी शरद पवारांपासून वेगळे झाल्यानंतर व्यक्त केली होती.
अजित पवार गटातील अमोल मिटकरी, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनीही वारंवार अजित पवार मुख्यमंत्री होणार याबाबत भाष्य केले आहे. अलीकडे हा दावा करण्यामध्ये रुपाली चाकणकर यांचीही भर पडली आहे. गेल्या काही काळापासून त्या सातत्याने अजित पवार मुख्यमंत्री होणार, असे माध्यमांसमोर बोलत आहेत. त्यावरूनच आज शरद पवार गटाच्या सोशल मीडिया हँडलवरून टोला लगावण्यात आला आहे.
“दादा पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री होणार असतील तर त्यांना पहिला हार घालायला मी जाईन”, असे विधान सुप्रिया सुळे यांनी मध्यंतरी केले होते. त्यावर शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारून त्यांचे मत जाणून घेतले. शरद पवार त्यावेळी म्हणाले होते, “हे स्वप्न आहे. ही काही घडणारी गोष्ट नाही.” त्यामुळे ‘भावी मुख्यमंत्री’ या दाव्यावरून दोन्ही गटात आगामी काळात आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता दिसते.