अजित पवार गटाचं कर्जतमध्ये दोन दिवसीय वैचारिक शिबीर पार पडत आहे. यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाच्या सुनावणीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वकिलांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘भेकड’ संबोधण्यावरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच, अजित पवार भेकड असते तर सरकार स्थापन करण्याची हिंमत दाखवली नसती, असंही तटकरेंनी सांगितलं. याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुनील तटकरे काय म्हणाले?

“निवडणूक आयोगाच्या सुनावणीवेळी अजित पवारांना भेकड संबोधण्यात आलं. अजित पवार भेकड असते, तर सरकार स्थापन करण्याची हिंमत दाखवली नसतील. पण, आता अजित पवारांच्या पाठीमागे आपल्याला उभारायचं आहे. अजित पवारांनी घेतलेला निर्णय क्रांतिकारी असल्याचं आपल्याला कृतीतून सिद्ध करण्याची गरज आहे,” असं सुनील तटकरेंनी म्हटलं.

याला ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर विकास लवांडेंनी सुनील तटकरेंना १० प्रश्न विचारले आहेत. “अजितदादा भेकड नाहीत, दिलेला शब्द पाळणारे अजितदादा, प्रशासनावर वचक असणारे अजितदादा, भाजपाबरोबर सरकार आणि ४३ आमदारांचा पाठिंबा आणि घड्याळ तेच वेळ नवीन…. वगैरे वगैरे भाषणबाजी करणारे निवडणूक आयोगाकडे नोंदणी नसलेल्या गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आपण माझ्या सामान्य प्रश्नांची उत्तरे द्याल का?” असा सवाल विकास लवाडेंनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा : “…अन्यथा २०१९ सालीच भाजपा आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन झालं असते”, सुनील तटकरेंचं मोठं विधान

हेही वाचा : “७० हजार कोटींवरून अजित पवारांना लक्ष्य करण्यात आलं, कारण…”, सुनील तटकरेंचं विधान

विकास लवाडेंनी ‘हे’ १० सवाल उपस्थित केले

  • “अजितदादा भेकड नसते हिंमत असती, तर स्वतःचा नवा पक्ष स्थापन केला असता. पण, तसे न करता पक्ष संस्थापक शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कुणाच्या आधाराने हक्क दाखवत आहात? स्वाभिमानी अजितदादा दिल्लीपुढे का झुकले? ईडी ला का घाबरले? ईडीला शरद पवारांनी जसे आव्हान दिले होते, तसे जाहीर आव्हान का दिले नाही? तुम्ही सर्वजण भेकड की अटकेला घाबरले?”
  • “प्रशासनावर वचक असता तर प्रशासनातील प्रचंड भ्रष्टाचार, काम चुकारपणा कसा व का वाढला? जनतेची जातीचे दाखले ते इतर योजनांची विविध स्तरावर काम प्रलंबित का आहे ? झिरो पेंडंसी का नाही? 4 महिन्यात कोण सार्वजनिक महत्वाची कामे केली? मराठा आरक्षण मुद्यावर काय भूमिका बजावली? भुजबळांना पाठींबा की मराठा आंदोलकांना पाठींबा हे कधी सांगणार?”
  • “सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपा घेत नाही त्याला तुमचा पाठिंबा आहे का? कारण आधी अजितदादा सतत मागणी करत होते आत्ता गप्प का?
  • “४३ आमदारांची घेतलेली पाठिंब्याची प्रतिज्ञापत्र दिशाभूल करून दबावाखाली जबरदस्तीने घेतली की नाही? त्यांचा सर्वांचा एकत्रित फोटो व्हिडिओ जनतेला का दाखवत नाही?”
  • “खोके सरकारमध्ये अजितदादा दोन नंबरचे उपमुख्यमंत्री आहेत. हे दादांचे प्रमोशन की डिमोशन आहे? हा दादांचा स्वाभिमान की आणखी काय समजायचे?”
  • “‘घड्याळ तेच, वेळ नवीन’ कुठून येतो इतका आत्मविश्वास? दिल्लीची अदृश्य शक्तीमुळेच ना?”
  • “देशाच्या पंतप्रधानांनी भोपाळ सभेत जाहीरपणे केलेला ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा व भ्रष्टाचाराचा आरोप केला तो खरा की खोटा होता? त्याबाबत अधिकृत खुलासा कधी होईल?”
  • “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आजपर्यंत भाजपाने जे जे विविध भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ते कुणावर केले होते? पक्षाची कायमच बदनामी कुणामुळे होत होती?”
  • “तुम्हाला सर्वांना अनेक वर्ष मंत्रीपदे मिळाली सत्ता उपभोगायला मिळाली निवडणुकीत मते मिळाली कुणामुळे? राज्यात सर्व तुमच्या सर्वांच्या हातात सत्ता व पक्ष होता तो पक्ष का वाढवला नाही? लहान मोठे सर्वत्र ठेकेदार कुणी जपले होते?”
  • “आपल्याला राजकीय पटलावर ज्यांनी मोठी ओळख निर्माण करून दिली त्या आदरणीय शरद पवारांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करता येत नसेल तर किमान कृतघ्नपणा तरी का करता?”
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar group 10 question ajit pawar group sunil tatkare ssa
Show comments