Amol Kolhe : विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागलेलं आहे. मागील काही दिवसांपासून सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे. प्रचारासाठी दिल्लीतील दिग्गज नेत्यांनीही राज्यातील विविध मतदारसंघात जाहीर प्रचारसभा घेतल्या. मात्र, आज (१८ नोव्हेंबर) निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असून थोड्या वेळात प्रचाराच्या थोफा थंडवणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या पार्श्वभूमीवरच बारामतीत आज युगेंद्र पवार यांची सांगता सभा पार पडली. या सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांचा उल्लेख करताना अर्धे उपमुख्यमंत्री असा करत आता बारामतीचा नवा युगेंद्र दादा, असं म्हटलं आहे. अजित पवारांच्या टीकेला उत्तर देताना मी पक्ष बदलला. मात्र, पक्ष चोरला नाही. मला कोणी नकलाकार म्हणत असेल. पण मला कोणी गद्दार म्हणत नाही, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला.

हेही वाचा : नाना पटोले हे स्वयंघोषित मुख्यमंत्री, खासदार प्रफुल पटेल

अमोल कोल्हे काय म्हणाले?

“आता बारामतीचा नवा दादा युगेंद्र दादा. मी महाराष्ट्रभर फिरत असताना मला लोकांनी सांगितलं की मतदानाची तारीख नोव्हेंबर २०, निकालाची तारीख नोव्हेंबर २३ आणि घरी पाठवायचे शिंदे, अजितदादा अन् फडणवीस. हे मी नाही तर संपूर्ण महाराष्ट्र म्हणत आहे. लोकसभेला जर शरद पवारांची लाट असेल तर विधानसभेला त्सुनामी आली आहे. परवा अर्धे उपमुख्यमंत्री आमच्या शिरुर लोकसभा मतदारसंघात आले आणि बोलून गेले. मी तेव्हाच सांगितलं की आसं चालणार नाही. जवाब मिलेगा, करारा जवाब मिलेगा. अजित पवारांनी सांगितलं की अमोल कोल्हेंनी पक्ष बदलले. मात्र, कदाचित एजन्सी चुकली असेल. एजन्सीने सांगितलं असेल की मनसे, भाजपा राष्ट्रवादी. आता मनसे आणि भाजपात आपण कधीच नव्हतो. अजित पवारांनी म्हटलं की मी पक्ष बदलला. अहो मी पक्ष बदलला, पण पक्ष चोरला नाही”, असा हल्लाबोल अमोल कोल्हे यांनी बारामतीत केला.

“अमोल कोल्हेंना तुम्ही नकलाकार म्हणता. पण मला कोणी नकलाकार म्हणत असेल ते माझ्यासाठी महत्वाचं नाही. मला कोणी नकलाकार म्हणत असेलही. मात्र, मला कोणी गद्दार म्हणत नाही. मला काल सल्ला दिला होता की चष्मा बदला. पण चष्मा महत्वाचा नसून नजर महत्वाची असते. मग तुम्हाला जनता कोणत्या नजरेने पाहात आहे हे महत्वाच आहे”, अशा शब्दांत अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर टीका केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar group amol kolhe on ajit pawar in baramati assembly election politics gkt