Anil Deshmukh On Devendra Fadnavis : विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सध्या अनेक नेत्यांचे महाराष्ट्रभर दौरे सुरु आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून आढावा बैठका घेत आगामी निवडणुकीबाबत पक्षाच्या कामांचा आढावा घेत उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. यातच भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरातील दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही दिवसांपूर्वी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. ‘राजकीय फायद्यासाठी खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांकडून दबाव आणला जात होता’, असा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. त्यानंतर अनिल देशमुख आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले होते. मात्र, यानंतर आता अनिल देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उभे राहणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याच्या चर्चांवर अनिल देशमुख यांना विचारण्यात आलं असता त्यांनी जास्त बोलणं टाळलं.

हेही वाचा : Ajit Pawar : अजित पवारांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना झापलं, “तुम्हाला इथे काय…”

अनिल देशमुख काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याच्या चर्चांवर अनिल देशमुख यांना आज पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. यावर अनिल देशमुख यांनी मोजक्या शब्दांत उत्तर देत अधिक बोलणं टाळलं. अनिल देशमुख म्हणाले, “मी एकटा कधी निर्णय घेत नसतो. आमचा पक्ष जे काय असेल ते ठरवेल आणि आदेश देईल”, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

अनिल देशमुखांना फडणवीसांच्या विरोधात उभं करण्याच्या हालचाली

विधानसभा निवडणुकीची घोषणा अद्याप झाली नसली तरी महायुती आणि महाविकास आघाडीने निवडणुकीच्या तयारीस सुरुवात केली आहे. या अनुषंगानेच नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरु असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. अनिल देशमुख हे काटोल या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून पाच वेळा निवडून आले. यंदाही ते तेथूनच लढणार, असा अंदाज बांधला जात होता. मात्र, आता त्यांच्या नावाची चर्चा दक्षिण-पश्चिम नागपूरसाठी होऊ लागली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar group anil deshmukh on devendra fadnavis in nagpur constituency assembly election 2024 gkt