NCP Sharad Pawar Group : विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. यानंतर महाविकास आघाडीतील पक्षांकडून पराभवाच्या कारणांचा शोध घेण्यात येत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत अपयश का आलं? या मागची कारणं काय आहेत? तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईत महत्वाची बैठक पार पडली. विधानसभेत झालेल्या पराभवानंतर शरद पवार गटाची ही पहिलीच बैठक आहे. त्यामुळे या बैठकीत पक्षाच्या पदरी पडलेलं अपयश आणि आता आगामी महापालिकांच्या निवडणुकीची रणनीति यासंदर्भात चर्चा झाली.

यावेळी शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत पुन्हा एकदा जोमाने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीसाठी राज्यभरातून शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आले होते. मात्र, याच बैठकीत काही कार्यकर्त्यांनी नवीन प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी केली. एवढंच नाही तर भर कार्यक्रमात शरद पवारांसह सर्व नेत्यांसमोर एका कार्यकर्त्याने जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदासह सर्वांचे राजीनामे घ्या आणि नव्या तरुण चेहऱ्यांना संधी द्या, अशी मागणी केली. पण प्रदेशाध्यक्ष हा मराठा समाजातील नसावा, असंही कार्यकर्त्याने म्हटलं. दरम्यान, कार्यकर्त्याने केलेल्या या मागणीचा व्हिडीओ आता व्हायरल होत असून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आल्याची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “मागच्या दहा वर्षांत २०१९ हे वर्ष आलंच नसतं तर…”

नेमकं काय घडलं?

“आपण सर्वांचे राजीनामे घ्या आणि नवीन तरुणांना संधी द्या. प्रदेशाध्यक्षांपासून सर्वांची नवीन निवड करा. शक्यतो सर्वसामान्य कार्यकर्त्याला भेटणारा आणि मराठा समाजाच्या व्यतिरिक्त तरुण कार्यकर्त्याला आपण संधी द्या. राज्यामध्ये वेगळं वातावरण सुरु आहे. मात्र, आपल्याला शरद पवार यांच्या नेतृत्वाचा फायदा घ्यायचा असेल आणि जो प्रदेशाध्यक्ष म्हणून वेळ देऊ शकेल अशा प्रदेशाध्यक्षांवर जबाबदारी द्या. याचा अर्थ जयंत पाटील हे वेळ देत नव्हते असं अजिबात नाही. मात्र, नवीन तरुणांना संधी द्या ही विनंती करतो”, अशी मागणी एका कार्यकर्त्याने केली.

“तसेच एक छोटी सूचना करतो की ज्या प्रमाणे सर्व नेते घरी असतात आणि बैठकीच्या दिवशी मुंबईत येत असतात. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याची आणि राज्याची एक तारीख ठरवून द्या. त्या दिवशी प्रत्येक जिल्हा कार्यकारिणीची बैठक झालीच पाहिजे. त्या दिवशी तालुकाध्यक्ष, विधानसभा प्रमुख आणि आमदार खासदार यांनी त्या बैठकीला हजर राहिलंच पाहिजे अशी बैठक ठेवा. तरच आपली संघटना येईल अन्यथा आपण फक्त कागदावरच मोठे दिसतो. प्रत्येक्षात मोठे दिसत नाहीत. जर आपण काम केलं तरच आपला फायदा होईल”, अशी मागणीही एका कार्यकर्त्याने केली.

Story img Loader