Jayant Patil On Ajit Pawar : विधानसभेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. राज्यातील विविध मतदारसंघात नेत्यांचे दौरे सुरु आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून निवडणुकीचा आढावा घेत उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. तसेच सभा, मेळावे, पक्षाच्या कामांचा आढावा आणि आगामी निवडणुकीबाबतची रणनीती आखण्याचं काम सध्या नेत्यांकडून सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
राज्य सरकारने आणलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून मागील काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका टिप्पणी सुरु आहे. असे असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘पिंक पॉलिटिक्स’वरूनही विरोधक सातत्याने टीका करत असल्याचं पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार व प्रसिद्धीची रणनीती आखत अजित पवार हे पक्षाच्या सभा, कार्यक्रमामध्ये सर्वत्र गुलाबी रंग प्राधान्याने वापरत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच विशेष म्हणजे स्वत:अजित पवार हे देखील गुलाबी रंगाचे जॅकेट वापत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता यावरूनच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. एका कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “आता काही दिवसांनी तुमच्याकडे काहीजण रंगीबेरंगी कपडे घालून येतील. मात्र, सावध राहा”, असं सूचक विधान जयंत पाटील यांनी केलं.
जयंत पाटील काय म्हणाले?
“आपल्या घरातील एखादा मुलगा जर बेरोजगार असेल तर त्याची जबाबदारी या राज्यातील सरकारची आहे. लोकसभा निवडणुकीआधी कोणीही लाडक्या बहिणी नव्हत्या. लोकसभा निवडणुकीच्यावेळी महाराष्ट्रात किती बहिणींना त्रास झाला, याबाबत मी जास्त सांगण्याची गरज नाही. मात्र, जनतेने लोकसभेची चपराक दाखवली आणि हे सर्वजण जाग्यावर आले. मात्र, आता त्यांना सर्वजण लाडके व्हायला लागले आहेत. हे पुतना मावशीचं प्रेम आहे. हे सावत्र भावाचं प्रेम आहे. सावत्र भाऊ फक्त तीन महिन्यांसाठी तुम्हाला मदत करत आहे”, असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी महायुतीवर केला.
“मी तुम्हाला महाविकास आघाडीच्यावतीने विश्वास देतो की, तुम्ही महाविकास आघाडीला ताकद द्या. उद्या सत्तेत आल्यानंतर आमच्या तीनही पक्षांची एकत्रित आघाडी मिळून महायुतीने जेवढं दिलं, त्यापेक्षा जास्त देण्याचं काम आम्ही निश्चित करू. आता काही दिवसांनी अनेक लोक तुमच्याकडे येतील, काहीजण रंगीबेरंगी कपडे घालून येतील. मग तुमच्या मनात प्रश्न पडेल की आरे काय चाललं आहे? मात्र, आम्ही साधी माणसं आहोत”, असं म्हणत जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली.