Rohit Pawar On Ram Shinde : विधानसभेची निवडणूक पुढील काही दिवसांमध्ये जाहीर होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांचे नेते जोरदार कामाला लागले आहेत. अनेक नेत्यांकडून मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरु असून सभा, मेळावे घेण्यात येत आहेत. एकीकडे महायुतीच्या नेत्यांच्या सभा आणि दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे मेळावे सुरु आहेत. या माध्यमातून विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखली जात आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आता कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातही चांगलंच राजकारण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि भाजपाचे आमदार राम शिंदे यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला आहे. “विरोधकांनी (राम शिंदे) २० लाख रुपये देऊन सल्लागार नेमला आहे आणि माझी कॉपी करायला त्यांनी सुरुवात केली आहे, अशी खोचक टीका रोहित पवार यांनी नाव न घेता राम शिंदेंवर केली. यानंतर राम शिंदे यांनीही पलटवार करत माझ्या पेहरावावर बोलण्यापेक्षा मतदारसंघात पाच वर्ष काय केलं ते सांगा? असा सवाल केला.
रोहित पवार काय म्हणाले?
“मुंबईला गेल्यानंतर माणूस गोरा का होतो? हे मला माहिती नाही. आता तर कहरच झाला. मी युवा आहे, पण काहींनी आता २० लाख रुपये देऊन सल्लागार नेमला आहे. त्या सल्लागाराला सांगितलंय की, रोहित पवारांना कॉपी करायचं. समाजकारण आणि राजकारणात काम करत असताना माझ्या डोक्याचे केस पांढरे झाले, पण तरीही मी ते काळे करत नाही. मात्र, २० लाख रुपये देऊन त्यांनी (राम शिंदे) सल्लागार नेमलेल्या सल्लागाराने त्यांना सांगितलं की तुम्हाला युवा दिसावं लागेल. मग काय तुमचे केस पाढंरे झालेत ते काळे करा. मग त्यांनी काळे केले. तुम्ही आता युवकांसारखे कपडे घालायला सुरुवात करा. मग त्यांनी तसे कपडे घालायला सुरुवात केली. आपण एक राखी पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम घेतला होता. त्यानंतर त्यांनीही लगेच कार्यक्रम घेतला. आता मला हे कळत नाही, जे आपण करत आहोत जर तेच ते करत असतील तर त्यांनी सल्लागार कशाला नेमला?”, असा हल्लाबोल रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर केला.
राम शिंदेंनी काय प्रत्युत्तर दिलं?
“मला वाटतं विरोधकांना मतदारसंघातील सर्व प्रश्न कळून चुकले आहेत. त्यामुळे ते आता माझ्या पेहरावावर बोलायला लागले आहेत. ते आता माझ्या पेहरावावर आले आहेत. मी एक ग्रामीण भागातील व्यक्ती आहे. विरोधकांना माझ्या पेहरावावर बोलायला सुरुवात केली, याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, त्यांना दुसरे प्रश्न शिल्लक राहिले नाहीत. त्यामुळे त्यांनी आता मतदारसंघात पाच वर्षात काय केलं? हे सांगावं”, अशा शब्दांत राम शिंदे यांनी रोहित पवारांवर पलटवार केलं.