राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या आज अजित पवारांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी गेल्या होत्या. याआधी त्यांनी ७ मेच्या दिवशी म्हणजेच बारामतीत ज्या दिवशी मतदान होतं त्यादिवशीही मतदान झाल्यानंतर अजित पवारांच्या घरी उपस्थिती दर्शवली होती. अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांना भेटायला मी आले होते असं तेव्हा सुप्रिया सुळेंनी सांगितलं. आजही त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

काटेवाडीत अजित पवारांचं निवासस्थान

बारामतीतल्या काटेवाडीत अजित पवार यांचं निवासस्थान आहे. या ठिकाणी अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, त्यांच्या मातोश्री आशाताई पवार या सगळ्यांचं कुटुंब राहतं. २०२३ च्या जुलै महिन्यात अजित पवारांनी महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर मात्र अजित पवार विरुद्ध शरद पवार असा संघर्ष उभा राहिला. शरद पवारांविरोधात त्यांचे पुतणे अजित पवार यांनीच दंड थोपटले. शरद पवार यांचं आता वय झालं आहे त्यांनी निवृत्त व्हावं आणि आम्हाला काही चुकलं तर सल्ला द्यावा असं तेव्हा अजित पवार म्हणाले होते. तसंच त्यानंतर आलेली लोकसभेची निवडणूक ही शरद पवार आणि अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली होती.

बारामतीत काका विरुद्ध पुतण्या यांचा सामना झाला

बारामती हा शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी लोकसभेला सुप्रिया सुळेंना उमेदवारी दिली. कारण मागच्या तीन टर्म त्या खासदार आहेत. तर महायुतीने यावेळी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना तिकिट दिलं. बारामतीतला हा सामना नणंद विरुद्ध भावजय असा दिसत असला तरीही प्रत्यक्षात हा सामना शरद पवार विरुद्ध अजित पवार असाच होता. हा सामना शरद पवारांनी जिंकला आहे. बारामतीत शरद पवारांची ‘पॉवर’ दिसून आली. कारण लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विजयी झाल्या आणि सुनेत्रा पवारांचा पराभव झाला. लोकसभा निवडणूक निकालाला महिना उलटून गेल्यानंतर आज सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या घरी आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि विविध चर्चा सुरु झाल्या. मात्र दस्तुरखुद्द सुप्रिया सुळेंनीच या भेटीमागचं कारण सांगितलं आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

काटेवाडीतल्या या घरी मी आज आले होते. आशाकाकींची भेट घ्यायला मी या घरी आले होते. मी काकींना नमस्कार केला. सुनेत्रा वहिनींच्या आई होत्या, त्यांचं दर्शन घेतलं त्यांना नमस्कार केला, त्यानंतर आता मी निघाले आहे. आशाकाकींनाही आम्ही नमस्कार केला. आता शरद पवारांचा कार्यक्रम असल्याने मी निघाले आहे. काटेवाडतीलं हे घर शारदाबाई पवार आणि गोविंदराव पवारांचं घर आहे. इथे माझ्या आशाकाकी राहतात. मी जन्मापासून या घरात राहिली आहे. मी आशाकाकींना नमस्कार करायला आले होते असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

काटेवाडीतलं घर हे कुटुंबाचं घर आहे

काटेवाडीतलं घर हे कुठल्याही व्यक्तीचं घर नाही. ते शारदाबाई पवार आणि गोविंदराव पवारांचं घर आहे. त्यामुळे त्या घरावर आमचा सगळ्यांचा हक्क आहे. माझ्या बाकीच्या भावंडांनाही वाईट वाटतं की हे आपलं घर आहे. माझ्या आशाकाकी तिथे राहतात. मी इथे आधी येत नव्हते. मात्र यावर्षी संसदेत काम सुरु होतं. ज्या दिवशी पालखी दिवेघाटात होती तेव्हा पंतप्रधानांचं भाषण होतं म्हणून त्या दिवशी येऊ शकले नाही. त्यामुळे मी बारामतीत जिथे पालखी आहे तिथे जाते आहे. आज काटेवाडीत आले आहे. काकी येतील असं वाटलं होतं पण काकी नाही आल्या. त्यामुळे आशाकाकींना भेटायला गेले होते. अजित पवार आणि सुनेत्रा पवार जेवणाच्या कार्यक्रमात व्यग्र होते. त्यामुळे त्यांची भेट झाली नाही. सगळे गडबडीत होते, त्यामुळे कुणाशी काही चर्चा करायचा काही विषयच आला नाही. असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

Story img Loader