Jayant Patil On Ajit Pawar : राज्याच्या विधासभेची निवडणूक पुढील दोन महिन्यांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबतही सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये खलबतं सुरु आहेत. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महायुती असा मुख्य सामना रंगण्याची चिन्ह आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. “अजित पवार हे महाविकास आघाडीत असते तर मुख्यमंत्री झाले असते”, असं सूचक विधान जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं आहे.
जयंत पाटील काय म्हणाले?
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी ठाण्यात बोलताना मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केलं होतं. मुख्यमंत्री पदाची संधी हुकल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या. यावर आज जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाविकास आघाडीत असते तर कदाचित मुख्यमंत्री झाले असते. कारण महाराष्ट्रात महाविकास आघाडीसाठी चांगलं वातावरण आहे. आता महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल, असं वातावरण महाराष्ट्रात आहे. त्यामुळे ते (अजित पवार)असते तर त्यांना परिस्थिती सोईची झाली असती”, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? शरद पवार म्हणाले, “पृथ्वीराज चव्हाणांनी…”
आरक्षणाबाबत सरकारने निर्णय घ्यावा
“मराठा आरक्षणाबाबतची आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे. आता सरकारचा निर्णय सरकारने जाहीर करायचा आहे. सरकार मराठा आणि ओबीसी अशा दोन्ही बाजूंनी बोललं आहे. त्यामुळे सरकारची त्यांच्याबरोबर काय चर्चा झाली? हे आम्हाला माहिती नाही. सरकारने काय आश्वासन दिलं हे देखील आम्हाला माहिती नाही. आरक्षणाबाबत सरकारने आता निर्णय घ्यावा”, असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.
अनेकजण संपर्कात, पण…
“अनेकजण संपर्कात आहेत. पण ते आमच्याबरोबर येतील असा गैरसमज मी करणार नाही. कारण त्यांचं तिकडे व्यवस्थित सुरु आहे. त्यामुळे त्यांना आता इकडे येणं योग्य वाटत नसेल असं मला वाटतं. त्यामध्ये ईडीची टांगती तलवार आहे, त्यामुळे आमच्याकडे येण्यास जास्त कोणी उत्सुक नाही”, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
अजित पवार काय म्हणाले होते?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला होता. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले होते की, “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १९९९ साली तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २००४ साली आमदार झाले. या दोघांच्या आधी मी आमदार झालो. पण, ते माझ्या मागून येऊन पुढे गेले. कधी कधी मी गंमतीमध्ये सांगतो की, एकनाथ शिंदे यांना आमदार घेऊन आणल्यावर मुख्यमंत्री करणार असे तुम्ही सांगितले होते, मग जर मला सांगितले असते तर मी अख्खा पक्षच घेऊन आलो असतो”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं.