विधानसभेची निवडणूक येत्या काही महिन्यांत जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात सध्या हालचाली वाढल्या आहेत. राज्यातील सर्वच पक्षांचे नेते विविध मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. याबरोबरच ठिकठिकाणी सभा, मेळावे सुरु आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भातही खलबतं सुरु आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना पाहायला मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशातच आज भाजपाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या मेळाव्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गट महायुतीबरोबर तर शरद पवार गट विरोधी पक्षात आहे. यासंदर्भात बोलताना जयंत पाटील यांनी सूचक विधान केलं. “मराठी माणसाला सर्व गोष्टी सहन होतात. मात्र, गद्दारी सहन होत नाही. त्यामुळे गद्दारीचा नामशेष करण्यासाठी आम्ही तुम्हाला विश्वासाने जबाबदारी दिलेली आहे”, असं विधान जयंत पाटील यांनी केलं.

हेही वाचा : विधानसभेत मविआ किती जागा जिंकेल? शरद पवारांचा मोठा दावा; म्हणाले, “२८८ पैकी…”

जयंत पाटील काय म्हणाले?

“माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी आपल्या पक्षात प्रवेश केला आहे. मात्र, आमचं त्यांच्यावर बऱ्याच दिवसांपासून लक्ष होतं. त्या मतदारसंघात आमच्या काही सहकाऱ्यांची चलबिचल सुरु असल्याचं दोन ते अडीच वर्षांपासून लक्षात आलं होतं. त्यामुळे कोणीतरी स्थिर आणि विचाराचा पक्का माणूस आम्ही शोधत होतो. महाराष्ट्रात मातंग समाजाचं नेतृत्व सुधाकर भालेराव यांनी केलेलं आहे. तुम्ही ज्या परिसरातून आलेला आहात त्या परिसराकडे आमचे फार लक्ष आहे”, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.

“गद्दारीचा नामशेष करण्यासाठी आम्ही तुम्हाला विश्वासाने जबाबदारी दिलेली आहे. मराठी माणसाला सर्व गोष्टी सहन होतात. पण फसवलेलं सहन होत नाही. तुम्ही कोणाला फसवलं, त्यानंतर तुम्ही त्या माणसावर सोन्याच्या नोटांचा वर्षाव केला तरी मराठी माणूस बघत नाही. कारण मराठी माणसाला गद्दारी केलेली कधीही आवडत नाही. त्यामुळे आम्ही तुमच्यावर जी जबाबदारी टाकली त्या विश्वासाने तुम्ही त्या ठिकाणी विजय खेचून आणाल आणि गद्दारांना धडा शिकवताल”, असं जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील पुढे म्हणाले, “मध्यंतरी पक्षात फाटाफूट झाली. काही लोक तिकडे गेली. आता परत यायला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीत १० मतदारसंघापैकी जवळपास ८ मतदारसंघात आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून आले. आता आमची आपेक्षा आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीसारखी प्रेरणा घेऊन काम करा. महाराष्ट्रात घाबरलेलं सरकार आहे. या सरकारने लोकसभा निवडणुकीआधी एक अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर लोकसभा संपल्यानंतर दुसरा अर्थसंकल्प सादर केला. आता पहिल्या अर्थसंकल्पात चंद्र मागितला असता तरी चंद्रही वाटण्याचं काम झालं असतं. आता ६ लाख २० हजार कोटींचं बजेट मांडलं. त्यानंतर दुसऱ्याचं दिवशी लगेचच राज्याच्या अर्थमंत्र्यांनी ९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या. हे सरकार जे शक्य नाही त्या घोषणा करत आहे आणि निवडणुकीपुरतं लोकांना फसवण्याचं काम करत आहे”, असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar group state president jayant patil on ncp ajit pawar group politics gkt