Harshvardhan Patil On Ajit Pawar : विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी प्रमुख लढत होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी सध्या निवडणुकीची रणनीती आखत आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. तसेच सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून सध्या ठिकठिकाणी सभा आणि बैठका घेऊन उमेदवारांचा प्रचार करण्यात येत आहे.

यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. मात्र, यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते, हर्षवर्धन पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आता हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे. “मी पहाटे उठून कुठे जात नाही”, असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांना त्यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून खोचक टीका केली आहे.

हेही वाचा : थोरात कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे वसंत देशमुख पोलिसांच्या ताब्यात; जयश्री थोरात म्हणाल्या, “त्यांना प्रोत्साहन देणारे…”

हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून इंदापूरमधून विधानसभेची उमेदवारीही देण्यात आली. मात्र, ज्यावेळी हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश झाला त्या दिवशी झालेल्या सभेत हर्षवर्धन पाटील यांनी आपण लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांना अप्रत्यक्ष मदत केल्याचं खुद्द त्यांनीच सांगितलं होतं. हर्षवर्धन पाटील म्हणाले होते की, “सुप्रिया सुळे या आमच्या भगिनी आहेत. आम्हाला अभिमान आहे की, त्या चारवेळा खासदार झाल्या आहेत. पण त्यामध्ये तीनवेळा आमचा प्रत्यक्षपणे सहभाग होता. मात्र, यावेळी या लोकसभेच्या निवडणुकीत आमचा अदृश्य सहभाग होता”, असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या सभेत टीका केली होती. अजित पवार यांनी म्हटलं होतं की, “तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? एकीकडे तुम्ही आम्हाला घरी नेत जेवायला घालता आणि आता म्हणता अदृष्य प्रचार केला?”, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सवाल उपस्थित केले होते. यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर देत खोचक टीका केली आहे. हर्षवर्धन पाटील म्हणाले की, “अजित पवार हे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही सभेत काहीही बोलायला परवानगी असते. कारण ते कोणत्याही सभेत कोणाच्याही विरोधात बोलतात. ते का बोलतात तर महाराष्ट्राचे सर्वात मोठे नेते आहेत. त्यामुळे सहाजिकच आहे की, ते इंदापूरमध्ये आल्यानंतर माझ्यावर बोलल्याशिवाय त्यांचं भाषण होत नाही. मात्र, मी पहाटे उठून कुठे जात नाही. माझा कारभार जनतेमध्ये असतो. त्यामुळे जनतेच्या आग्रहाखातर आम्ही शरद पवारांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला”, असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे.