सांगली : सत्तेवर येण्याच्या आधी ज्यांनी कर्जमाफीची घोषणा केली त्यांनी सत्तेवर आल्यावर मात्र सोयीस्करपणे कर्जमाफीला बगल दिली, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केली. जत तालुक्यातील तिकोंडी येथे जय हनुमान नागरी सहकारी पतसंस्थेच्या इमारतीचे उद्घाटन आ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
आ. पाटील बोलताना म्हणाले, लाडक्या बहिणींना एकवेळ १५०० रुपयाचे २१०० रुपये पण दिले जातील पण ते पुढच्या निवडणुकीच्या तोंडावर दिले जातील. आता आम्ही कोणतीही घोषणा करू शकत नाही, कारण आमचा जोरात पराभव झाला आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर ३ लाख ६८९ शेतकऱ्यांना ३४१ कोटी ४८ लाख रुपये कर्जमाफी दिली होती. आपल्या जत तालुक्यातील १२ हजार ७१० शेतकऱ्यांना ६७ कोटी ६४ लाख रुपये कर्जमाफी दिली.
समाज माध्यमांच्या वाढत्या प्रभावावर बोलताना आ. पाटील म्हणाले, मोबाइलवरील व्हॉटसॲपचा वापर आता सार्वत्रिक झाला असून यावर येणारी माहिती केवळ गुन्हेगारी स्वरूपाची आणि राजकीय टीका-टिप्पणीचीच अधिक असते. मोबाइलवर बलात्काराच्या घटनेची माहिती घेत असतानाच, एखादी खून झाल्याची माहिती हाती येते, तर दुसऱ्या बाजूला राजकीय आरोप-प्रत्यारोप, टीका-टिप्पणीची माहिती मिळते.
एक का अनेक लफडी या मोबाइलच्या माध्यमातून वापरकर्त्यांच्या मनावर आघात करत आहेत. यामुळे मूळ प्रश्न दुर्लक्षितच होत आहे. बेरोजगारीसारखी गंभीर समस्या आ वासून समोर असताना त्याकडे तरुण वर्गाचे दुर्लक्ष होत आहे. उद्याचे भविष्य हाती असताना तरुणाई आभासी जगात वावरत असून याचे गंभीर परिणाम भावी पिढीवर होणार आहेत, असा इशाराही आ. पाटील यांनी यावेळी दिला.