कराड : मतयंत्राबाबतची (ईव्हीएम) भूमिका नक्कीच संशयास्पद असून, ‘महायुती’चे संख्याबळ १६० च्या पुढे कसे गेले? याचे भाजपवाल्यांनाही आश्चर्य वाटत असेल. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जातात आणि गुजरातची मतयंत्रं महाराष्ट्रात येतात. त्यामुळे त्यात काहीतरी घोळ असून, राज्यात बऱ्याच उमेदवारांचे मताधिक्य जवळपास सारखेच कसे? अशा आमच्या अनेक प्रश्नांची निवडणूक आयोगाने समर्पक उत्तरे द्यावीत अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली. माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त कराडच्या प्रीतिसंगमावरील त्यांच्या समाधीस्थळी रोहित पवारांनी अभिवादन केले. त्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असल्याचे सांगत रोहित पवार म्हणाले, मतयंत्रासंदर्भातील न्यायालयीन लढाईबाबत महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील. हा विषय न्यायालयात गेल्यावर योग्य वेळेत निकाल मिळणे गरजेचे आहे. नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची? याबाबतच्या निकालाला तीन वर्षे कधी निघून गेली, हे कळलेही नाही. उशिरा दिलेले निकालही अन्यायच असतो, असे मत रोहित पवार यांनी नोंदवले. मध्यप्रदेशमध्ये कुणाल पाटील यांना त्यांच्या राहत्या गावात एकही मत मिळाले नसल्याचे आश्चर्यही त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : Ahmednagar Vidhan Sabha Result : अहिल्यानगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे रोहित पवार एकमेव विजयी आमदार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या न्यायालयीन सुनावणीसंदर्भात ते म्हणाले, उच्च व सर्वोच्च न्यायालयाकडून आता कोणत्याही अपेक्षा राहिलेल्या नाहीत. लोकांवर विश्वास होता. परंतु, महाराष्ट्रात लागलेला निकाल हा लोकांसाठीही अनपेक्षित आहे. नेत्यांनी जरी तो स्वीकारला तरी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना तो स्वीकारणे अवघड आहे.

सातारा जिल्ह्यात ‘महाविकास आघाडी’चे उमेदवार बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज चव्हाण, सत्यजितसिंह पाटणकर यांना जवळपास सारखी मते पडली आहेत. पोस्टल मतांच्या तुलनेत मतयंत्राचा कौल फारच वेगळा आहे. आमच्या बालेकिल्ल्यात आमची वजावट झाल्याने कुठेतरी पाणी मुरतय हे जाणवायला लागले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘महायुती’ला लाडकी बहीण योजनेचा वाटतोय तेवढा फायदा झाला नसावा. त्यांच्या मताधिक्यामागे दुसरे काहीतरी कारण असावे, त्याचा अभ्यास करायला हवा. हाताला काम, पोटाला अन्न या व्यतिरिक्त हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रचाराची दिशा वळवली गेली. संतांच्या भूमीत भाजपने मोठ्या प्रमाणावर केलेल्या भेदभावालाही काही प्रमाणात यश आले. यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या भूमीत दोन्ही उमेदवार पडण्याचे कारण मतयंत्र तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यांनी केलेली वातावरण निर्मिती हेही असावे अशी शंका पवारांनी व्यक्त केली.

हेही वाचा : Ajit Pawar : रोहित पवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा म्हणाले, “शहाण्या थोडक्यात…”

संविधान पायदळी तुडवतील

राज्य सरकार २६ नोव्हेंबरपर्यंत स्थापन करणे गरजेचे आहे. परंतु, लोकशाही आणि संविधान पाळणारे हे पक्ष नाहीत. ते मनमानी करतील. निवडणूक आयोग त्यांच्या खिशात आहे. न्यायालयाची भूमिकाही काही निर्णयांबाबतीत संशयास्पद असल्याने न्यायालयात जाऊनही काही उपयोग नाही. त्यामुळे लोकशाही आणि संविधान पायदळी तुडवून ते उद्यापर्यंतचा कालावधीही ओलांडतील, अशी टीका रोहित पवारांनी एका प्रश्नावर केली.

यशवंतराव चव्हाणांचे कार्य, विचारांसमोर आपण नतमस्तक होऊन प्रेरणा घेतली. पुढील पाच वर्षे जनविकास आणि महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी लोकांमध्ये जाऊन आम्ही सर्वजण लढत राहणार आहोत. त्याला विधानसभा निकालानंतरच सुरुवात केल्याचे पवारांनी सांगितले.

हेही वाचा : “माझ्याविरोधात कट”, पराभवानंतर राम शिंदे अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याचा दाखला देत म्हणाले, “त्यांचा राजकीय सारीपाट…”

एकहाती सत्तेचे भाजपचे मिशन

पहिले एक वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील. तर नंतरचे चार वर्ष भाजपकडे मुख्यमंत्रीपद राहील, असा अंदाज एका प्रश्नावर बोलताना आमदार पवार यांनी व्यक्त केला. तसेच २०२९ ला एकहाती सत्ता मिळवण्याची भाजपची रणनीती आतापासून आहे. त्याला यावेळी काही प्रमाणात यश आले. ते आत्ता १४४ ला कमी पडले. ‘मनसे’ने बऱ्याच ठिकाणी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे उमेदवार पाडले. यामागे फडणवीस यांचे डोके होते. त्याचबरोबर सध्याचे समीकरण पाहता अजित पवारांना दोन वर्षे मुख्यमंत्रीपद मिळेल, असे आपल्याला वाटत नाही. गेल्यावेळीची मंत्रिपदे यावेळी त्यांना मिळाले तरीही पुष्कळ झाले अशी खिल्ली रोहित पवारांनी उडवली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar mla rohit pawar bjp surprised after mahayuti crossed 160 vidhan sabha seats also expressed evm suspicion css