काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाठीत खंजीर खुपसला जात असल्याचा आरोप केला आहे. नाना पटोले यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं म्हटलं आहे. लोणावळ्यात बोलताना त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा साधला होता. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाना पटोलेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना टाळलं असून त्यांच्यासारख्या लहान माणसावर बोलणार नाही असं म्हटलं आहे. बारामती येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सोबत राहून पाठीवर सुराच खुपसायचा असेल तर…; नाना पटोलेंचं उद्धव ठाकरे, अजित पवारांवर टीकास्त्र

नाना पटोले यांच्या वक्तव्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “या गोष्टीत मी पडत नाही. ती लहान माणसं आहेत, त्यांच्यावर मी कशाला बोलू? जर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या काही बोलल्या असत्या तर मी बोललो असतो”.

प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार

शरद पवारांनी यावेळी काँग्रेसकडून देण्यात आलेल्या स्वबळाच्या घोषणेवरही प्रतिक्रिया दिली. “प्रत्येकजण आपला राजकीय पक्ष मोठा करण्याच्या प्रयत्नात असणार. काँग्रेसने भूमिका घेतली असेल तर त्यात काहीही चुकीचं नाही. आम्ही सरकार एकत्र चालवतो, याचा अर्थ आम्ही पक्ष एकत्रित चालवत नाही. आम्ही प्रत्येकजण पक्ष वेगळ्या पद्धतीने चालवतो. प्रत्येकाला आपल्या पक्षाची व्याप्ती वाढावी अशी इच्छा असणार. यात काहीही चुकीचं नाही. त्यामुळे यात गैरसमज असण्याचं काहीही नाही. सरकार एक विचारानं आहे की नाही हे महत्वाचं आहे,” असं शरद पवार म्हणाले आहेत.

केंद्राच्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्रात गंडांतर?, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे राहील

शरद पवार यांनी यावेळी विधानसभा अध्यक्षपदावरही भाष्य केलं.” आमच्या तीन पक्षांचा निर्णय झाला आहे. विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं आणि ते काँग्रेसकडेच राहणार आहे. त्यामुळे कोणीही काही बोलायचा संबंधच येत नाही. आम्हा तिन्ही पक्षांना काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे. त्या निर्णयावर आम्ही कायम आहोत,” असं शरद पवारांनी सांगितलं.

काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेवर शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले…

नाना पटोलेंनी काय म्हटलं –

“मी जे बोललो त्यात माघार घेणारच नाही. स्वबळावरच निवडणूक लढवणार. त्यामुळे आपण कामाला लागा. मी माध्यमांशी बोलताना म्हणालो की, मुख्यमंत्र्यांनी काल शिवसैनिकांना कामाला लागण्याबद्दल सांगितलं. मग मी बोललो होतो तर त्रास होत होता, ते बोलले तर ठीक आहे. आता बारामतीवाले पुण्याचे पालकमंत्री आहेत ते कुणाची कामं करतात…आपल्या लोकांची कामं करतात का? मग आपण संपर्कमंत्र्यांना लक्ष घालायला सांगतो, पण संपर्कमंत्र्यांचं ऐकायचं की नाही ते त्यांनी ठरवायचं… कारण सही त्यांची लागते. संपर्कमंत्र्यांची सही लागत नाही,” असा टोला नाना पटोले यांनी लगावला होता.

“ज्या लोकांना तडजोड करायची नसेल, सोबत राहूनही पाठीत सुराच खुपसायचा असेल तर आपल्याला काही बोलायचंच नाही. तो राग आपल्याला ताकद बनवायचा आहे”, असंही नाना पटोले म्हणाले होते.

Story img Loader