खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकार कोसळणार असल्याचा दावा केला असून त्यानंतर भाजपा नेते आणि शिंदे गटाकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. यादरम्यान आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या भविष्याबद्दल जाणून घेण्यासाठी सिन्नरमध्ये एका ज्योतिषाची भेट घेतल्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावरुन मुख्यमंत्र्यांना टोला लगावला असून महाराष्ट्रात हे प्रकार नवीन असल्याचं म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यपालांचं विधान, जितेंद्र आव्हाड अटक, श्रद्धा वालकर अशा इतर मुद्द्यांवरही भाष्य केलं.
सरकारच्या स्थिरतेबद्दल वेगवेगळे प्रश्न निर्माण केले जात आहेत. दोन महिन्यात हे सरकार कोसळेल असा दावा केला जात आहे. तसंच मुख्यमंत्री वारंवार बैठका घेत असून देवदर्शन करत आहेत यासंबंधी शरद पवार यांना विचारण्यात आलं असता, हात दाखवत त्यांनी आपण काही ज्योतिषी नसल्याचं म्हटलं आहे.
“मी काही ज्योतिषी नाही, त्यामुळे मी काही सांगू शकणार नाही. माझा त्यावर विश्वासही नाही, त्यामुळे मी दौरा सोडून हात दाखवायला कुठे जात नाही. आपण आता हल्ली नवीन गोष्टी पाहत आहोत. महाराष्ट्रात याआधी असं होत नव्हतं,” अशी टीका शरद पवारांनी केली आहे.
एकनाथ शिंदेंनी भविष्य पाहिल्यावरून अजित पवारांनी कान टोचले, हसत हसत म्हणाले, “ज्योतिषाकडे जाऊन…”
“आसाममध्ये काय घडलं हे सर्व देशाला माहिती आहे. आता पुन्हा एकदा आसामची ट्रीप होणार असल्याचं मी वाचलं. त्याच्याशी सुसंगत कार्यक्रम बंद करुन शिर्डीला जाणं आणि नंतर सिन्नरला जाऊन कोणाला तरी हात दाखवणं या गोष्टी आमच्यासाठी नवीन आहेत. पुरोगामी विचारांचं राज्य असा लौकिक असलेल्या महाराष्ट्रात या नवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत. पण या गोष्टीचा स्वीकार करत नाही हे जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही,” असंही शरद पवारांनी सांगितलं.
नेमकं प्रकरण काय आहे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बुधवारी (२३ नोव्हेंबर) शिर्डी दौऱ्यावर असताना अचानक पूर्वनियोजित कार्यक्रमात बदल करून सिन्नरमधील ईशान्येश्वर मंदिराला भेट दिली. यानंतर एकनाथ शिंदेंनी ईशान्येश्वर मंदिरामध्ये एका ज्योतिषाकडून आपलं भविष्य जाणून घेतल्याची जोरदार चर्चा आहे. त्यावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
राज्यपालांवर टीका
“राज्यपाल ही एक संस्था आहे. त्याच्या काही मर्यादा आणि बंधनं असतात. मात्र छत्रपतींचा उल्लेख करताना त्यांनी सगळ्या मर्यादा सोडल्या. त्या प्रकरणानंतर त्यांचं छत्रपतींबद्दल (चांगलं) बोलल्याचं विधान आलं. मात्र सगळ्या प्रतिक्रियांनंतर केलेलं हे विधान म्हणजे उशीराचं शहाणपण आहे,” असं पवार म्हणाले. तसंच राज्यपालांच्या विषयात आता राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी लक्ष घालावं असं सूचक विधानही पवारांनी केलं. “याचा निर्णय राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी घ्यावा. अशा व्यक्तीला अशा (राज्यपाल पदासारख्या) जबाबदाऱ्या देऊ नये,” असं पवार म्हणाले.