गेल्या महिन्याभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. खुद्द शरद पवार आणि अजित पवारांनी यावर स्पष्टीकरण दिल्यानंतरही या चर्चा थांबायचं नाव घेत नसताना आता शरद पवारांनीच केलेल्या एका विधानाची नव्याने चर्चा होऊ लागली आहे. महाविकास आघाडीच्या ऐक्याविषयी आधीच संभ्रम निर्माण झालेला असताना शरद पवारांच्या या विधानामुळे आघाडीच्या भवितव्याबाबतच मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात तर्त-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चा!

अजित पवारांचा फोन काही काळासाठी नॉट रीचेबल लागणं किंवा त्यांनी काही कार्यक्रम रद्द करणं या गोष्टींमुळे गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अजित पवार शिंदे गट आणि भाजपाच्या सरकारला पाठिंबा देणार असल्याचेही तर्क लावण्यात आले. मात्र, “असं काहीही नाही”, असं स्पष्ट शब्दांत शरद पवारांनी सांगितलं. अजित पवारांनीही पत्रकार परिषदेत आपली ठाम भूमिका मांडल्यानंतर हे चर्चांचं वादळ काहीसं शमल्याचं दिसत असतानाच आता शरद पवारांचं नवीन वक्तव्य चर्चेत आलं आहे.

काय म्हणाले शरद पवार?

अमरावतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवारांनी महाविकास आघाडीतील जागावाटप आणि वंचित बहुजन आघाडीच्या मविआतील समावेशावर भाष्य केलं. “वंचित बहुजन आघाडी अर्था प्रकाश आंबेडकरांशी आमची महाराष्ट्रातील आघाडीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. फक्त कर्नाटक निवडणुकीत काही जागांबाबत त्यांच्याशी चर्चा झाली आहे”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

“गुजरात दंगलीतल्या आरोपींना निर्दोष सोडणं ही संविधानाची हत्या”, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल!

२०२४मध्ये मविआचं काय होणार?

दरम्यान, पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये मविआ एकत्र लढणार नसल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. त्यात सत्ताधाऱ्यांकडूनही वारंवार या मुद्द्यावरून टीका-टिप्पणी केली जात आहे. त्यासंदर्भात माध्यमांनी विचरणा केली असता शरद पवारांनी सूचक विधान केलं. “आम्ही एकत्र लढणार वैगरेबद्दल बोलायचं झालं, तर आज आमची आघाडी आहे. एकत्र काम करण्याची इच्छा आहे. पण फक्त इच्छाच नेहमी पुरेशी नसते. जागांचं वाटप, त्यात काही अडचणी आहेत की नाहीत यावर अजून चर्चा केलीच नाही. त्यामुळे यावर कसं सांगता येईल?” असं शरद पवार म्हणाले आहेत.

अजित पवारांचा फोडण्याचा प्रयत्न?

भाजपाकडून अजित पवारांना फोडण्याचा प्रयत्न होत असल्याच्या चर्चांवरही शरद पवारांनी भाष्य केलं. “कुणी फोडायचं काम करत असेल, त्यांचा तसा काही कार्यक्रम असेल तर ते करत राहतील. आम्हाला जेव्हा यासंदर्भात ठाम भूमिका घ्यायची असेल, तेव्हा ती घ्यावी लागेल. त्यावर आज काही सांगता येणार नाही. कारण याबाबत आम्ही काही चर्चाच केलेली नाही”, असं शरद पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar on mahavikas aghadi future in 2024 general elections pmw