गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपा विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोप दिसून आले. आता राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार अस्तित्वात आल्यानंतरही हा सामना चालूच आहे. सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपावर विरोधकांकडून सातत्याने सडकून टीका केली जात आहे. पण या पार्श्वभूमीवर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपा आमदार आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना निवडणुकीत पाठिंबा दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यावरून राज्यात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे नवं समीकरण जुळत असल्याच्याची चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावरून आता खुद्द शरद पवारांनी खुलासा केला आहे.
नेमकं घडलं काय?
भाजपा आमदार आशिष शेलार यांची नुकतीच बीसीसीआयचे कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. मात्र, त्याआधी त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला होता. या निवडणुकीमध्ये आशिष शेलार यांनी तयार केलेल्या पॅनलमध्ये खुद्द शरद पवार हेही होते. शरद पवारांनी या निवडणुकीत आशिष शेलार यांना पाठिंबा जाहीर केला होता. राज्यात इतर ठिकाणी कोणत्याही राजकीय समीकरणांमध्ये भाजपाविरोधी ठाम भूमिका घेणाऱ्या शरद पवारांनी या निवडणुकीत भाजपा नेते आशिष शेलार यांना का पाठिंबा दिला? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला होता. या चर्चांना आता शरद पवारांनी पूर्णविराम दिला आहे.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवारांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “आशिष शेलार हे याआधीही मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. काही क्षेत्रं अशी असतात, जिथे राजकारण आणायचं नसतं. क्रिकेटमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही राजकारण आणत नाही”, असं शरद पवार म्हणाले.
“..तेव्हा त्या गोष्टीची चर्चाही झाली नाही”
“खरंतर लोकांना हे माहिती नाही की मी बीसीसीआयचा अध्यक्ष होतो, तेव्हा गुजरातचे प्रतिनिधी नरेंद्र मोदी होते. मोदी माझ्या बैठकीला हजर होते. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हाच अरुण जेटली दिल्लीचे तर आत्ता केंद्रीय मंत्री असलेले अनुराग ठाकूर हिमाचल प्रदेशचे अध्यक्ष होते. त्यामुळे मी देशाचा अध्यक्ष आणि हे सगळे राज्यांचे अध्यक्ष असं आम्ही सर्वांनी तेव्हा एकत्र काम केलं. तेव्हा लोकांना ते लक्षातही आलं नाही. पण यावेळी त्याची चर्चा सुरू झाली. तात्पर्य एकच, की या ठिकाणी राजकारण आणायचं नाही”, असंही शरद पवारांनी यावेळी सांगितलं.
शरद पवारांनी आशिष शेलारांबरोबर युती का केली?, संदीप पाटील म्हणाले…
“उद्या सचिनला स्टेडियम बांधायला सांगितलं तर त्याला जमणार नाही!”
“खेळाडूंना प्रोत्साहित केलं पाहिजे. आम्हा लोकांचं काम खेळाडूंना हव्या असलेल्या सुविधा पुरवायच्या हे आहे.त्यांच्या खेळात आम्ही कधी पडत नाही. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर यांच्यासारखं उभं आयुष्य क्रिकेटला योगदान दिलेल्या लोकांच्या ज्ञानाचा उपयोग नवीन खेळाडू निवडणं आणि त्यांना तयार करणं यासाठी व्हायला हवा. हे काम त्यांचं आहे. त्यांना उद्या स्टेडियम बांधायचं काम जमणार नाही.ते काम आमचं आहे. कोणते खेळाडू निवडायचे हे काम त्यांचं आहे”, अशा शब्दांत शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.